आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचे समाधान – ललिता भोसले

पुणे : आपण सर्व कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उदरनिर्वाहासाठी काम करत असतो परंतु आरोग्य क्षेत्रात काम करताना मानवतेची सेवा केल्याचे विशेष समाधान लाभते असे प्रतिपादन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परीचारिका ललिता भोसले यांनी केले. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या लिबरल आर्ट्स विभागातर्फे भोसले यांचा सत्कार करण्यात आला त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. नुकताच आपल्या देशाने लसीकरणात १०० कोटी डोस इतका मोठा टप्पा पार केला तर ५० लाख डोसचा टप्पा पुणे शहराने गाठला याचे औचित्य साधत लसीकरणात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ललिता भोसले यांचा सत्कार करण्यात आला. भोसले व त्यांच्या सहकार्यांनी मिळून सुमारे दीड लाख लसीचे डोस दिले आहेत.

ललिता भोसले यांचा सत्कार एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लिबरल आर्ट्स, विधी, मीडिया आणि पत्रकारिता विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा पारासर आणि लिबरल आर्ट्स विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती जोशी उपस्थित होत्या.

मुळच्या मुंबईच्या असणाऱ्या ललिता भोसले या लग्नानंतर पुणे शहरात आल्या. भोसले यांच्या मातोश्री मुंबईच्या केईएम रुग्णालयात काम करत होत्या त्यामुळे आरोग्य क्षेत्राविषयी त्यांना लहानपणीपासूनच कुतूहल होते असे भोसले म्हणाल्या. इयत्ता १० वी मध्ये आरोग्य क्षेत्रात्ताच काम करायचे ठरवले. लग्नानंतर काही दिवस ब्रेक घेतला आणि पुन्हा दीनानाथ रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम सुरु केले. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट या अभूतपूर्व अशा होत्या परंतु कुटुंबीयांनी सहकार्य केल्यामुळे या काळात देखील मी रुग्ण सेवा करू शकले याचे समाधान आहे असे भोसले यांनी सांगितले. लसीकरणासारख्या राष्ट्रकार्यात आपला वाटा आहे ही अभिमानास्पद भावना कायमच मनात राहील आणि आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, असे भोसले यांनी आवर्जून नमूद केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: