याबाबत रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार म्हणाले, पुण्यापेक्षा ग्राहक मूल्य निर्देशांक कमी असणार्‍या व सीएनजी प्रतिकिलो 6 रुपये स्वस्त असलेल्या मुंबईत (मुंबई, ठाणे, नवी मुंबई) रिक्षा भाडेदर पहिला टप्पा दीड कि.मी. 21 रुपये आहे. नंतर प्रत्येक कि.मी.ला 14.20 रुपये आहे. त्यात पुन्हा वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक मूल्य निर्देशांक आणि सीएनजी दर हे दरवाढीच्या सूत्राचे प्रमुख घटक मुंबईपेक्षा जास्त असलेल्या पुण्यात रिक्षा भाडेदर मात्र कमी करण्याचा अजब निर्णय प्रशासनाने घेतला. पुण्यात प्रति किलोमीटर फक्त 71 पैसे तुटपुंजी दरवाढ करण्यात आलेली आहे. प्राधिकरणाने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि खटुआ समितीच्या सूत्रानुसार प्रति किलोमीटर किमान 2 रुपये दरवाढ द्यावी, अशी मागणी आहे.

मागील वर्षी कोरोना संकट होते. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रिक्षा संघटनांनी स्वत:हून भाडेवाढ नाकारली होती. त्याबद्दल प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संघटनांचे कौतुक केले होते.

नुकतीच झालेली दरवाढ तब्बल सहा वर्षांनी झाली आहे. मात्र आता इंधन, गॅस वाढ, इतर सर्व प्रकारची महागाई यामुळे रिक्षाचालकही संकटात सापडले आहेत. सध्या लागू असलेले सीएनजी दर हे भाडेदर निश्चिती समीकरणात घेतले आहेत काय? तसेच खटुआ समितीने दिलेल्या समीकरणानुसार दर निश्चिती झाली आहे का? असे प्रश्न पंचायतीने उपस्थित केले. रिक्षाचालकांच्या मागणीचे निवेदनही शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना दिले असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले.