Wednesday, September 30, 2026
Latest NewsPUNE

दसरा दिवाळी वाचन जागर महोत्सवाचे डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उद्घाटन

महोत्सवा अंतर्गत राज्यभरात १४ नोव्हेंबर पर्यंत पुस्तक प्रकाशने, लेखक तुमच्या भेटीला व मुलांसाठी शाळेमध्ये पुस्तक विषयक वर्ग आदी कार्यक्रमांचे करण्यात येणार आयोजन

पुणे  : वाचन जागर अभियाना अंतर्गत पुण्यातील ११ प्रकाशन संस्थांच्या वतीने येत्या १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत दसरा दिवाळी वाचन जागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज अप्पा बळवंत चौक येथील रसिक साहित्य येथे संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

चितळे बंधू मिठाईवाले उद्योग समूहाचे केदार चितळे, रसिक साहित्यचे शैलेश नांदूरकर, रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर, मनोविकास प्रकाशाचे आशिष पाटकर, साधना प्रकाशनचे मनोहर पाटील, डायमंड पब्लिकेशनचे दत्तात्रय पाष्टे, राजगुरुनगर वाचनालयाचे राजेंद्र सुतार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मनोविकास प्रकाशनच्या वतीने दत्तप्रसाद दाभोळकर लिखित विवेकानंदांची खरी ओळख आणि रोहन प्रकाशनच्या वतीने सायड या रवींद्र पांढरे लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यातील ११ प्रकाशकांनी एकत्रित येत दसरा दिवाळी वाचन जागर महोत्सवाचे आयोजन केले असून ११ प्रकाशकांची निवडक अशी प्रत्येकी ५० पुस्तके याप्रमाणे एकूण ५५० पुस्तकांचा महोत्सवामध्ये समावेश आहे. या सर्व पुस्तकांच्या खरेदीच्या छापील किंमतीवर १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सरसकट २५% सूट इतकी सूट देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील ३५ दुकानांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस, मनोविकास प्रकाशन, रोहन प्रकाशन, डायमंड पब्लिकेशन, मॅजेस्टिक प्रकाशन, जोत्स्ना प्रकाशन, साकेत प्रकाशन, साधना प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, राजहंस प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन आदी प्रकाशन संस्थांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “मागील दीड वर्षांच्या काळात नागरिकांची खूप घुसमट झाली असून या दरम्यान आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल अशी माझी खात्री आहे. बुद्धीची भूक भागविण्यासाठी प्रकाशकांनी एकत्र येत उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

केवळ ग्रंथविक्री हे उद्दिष्ट न ठेवता एकूण वाचनाविषयी आवड निर्माण करणे आणि शहरी व ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीचे संवर्धन करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे सांगत आशिष पाटकर म्हणाले, “वैयक्तिक पातळीवर प्रत्येक प्रकाशक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतोच मात्र त्यालाही काही मर्यादा आहेत. आम्ही सर्व प्रकाशकांनी या महोत्सवानिमित्त एकत्र येत याच मर्यादा ओलांडत वाचकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यात आजही ललित साहित्याचे दुकान नाही या महोत्सवा अंतर्गत आम्ही आज २३ जिल्ह्यांत पोहोचू शकलो आहोत याचा आम्हाला आनंद आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading