जिथे महिलांचा सन्मान, तिथे नवदुर्गेची शक्ती – डॉ. दत्ता कोहिनकर
पुणे : ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ याप्रमाणे जिथे महिलांचा सन्मान होतो, तिथे देवतेचा वास होतो. नवदुर्गेची शक्ती संचार करते. माता, पत्नी, बहीण, मैत्रीण या नात्याने संपूर्ण कुटुंबाला व समाजाला प्रेरणा देत असतात. त्यामुळे महिलांचा सन्मान ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विश्वशक्ती इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘सुर्यदत्ता नारीशक्ती पुरस्कार-२०२१’ वितरण सोहळ्यात डॉ. कोहिनकर बोलत होते. मुळशी तालुक्यातील आरोग्य, सामाजिक कार्य व जनसामान्यांचे प्रश्न सोडविणाऱ्या गावातील महिला सरपंचांना नवदुर्गा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल असे होते. यावेळी माजी पोलीस अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, डॉ. सनी अवसरमल, सीए भुषण तोष्णीवाल, वेल्थ मॅनेजमेंट कोच प्रा. संदीप सहस्त्रबुद्धे, एकेआर इंटर्न सोल्युशन्सचे हिमांशु मेहलावन, व्हिडी सोल्युशन्सचे विवेक डोला, पिनॅकल इव्हेंट्सचे चैतन्य धोका आदी मान्यवर उपस्थित होते.
मनिषा खेंगरे (खांबोली), उषा मारणे (आंबेगाव), सारीका काळभोर (हडशी), रेखा वाघ (भुकुम), स्वाती भेगडे (घोटावडे), पियुषा दगडे (बावधन), प्रियंका गायकवाड (कासे सराई), सविता पडवळ (लोणारवाडी), आरती रानवडे (नांदे), निकिता सणस (भुगांव) या नऊ महिला सरपंचाचा सन्मान झाला. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविणे, रस्त्यावरील दिवे लावण्याचा उपक्रम, पाण्याची टाकी बसविणे, बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून देणे, ग्रामपंचायत, गाव-मंदीर उभारणी अशा अनेक कार्यांनी या सरपंच महिलांचे कार्य उल्लेखनीय आहे. या सर्व महिला सरपंचानी आपल्या पुरस्काराचे श्रेय परिवारातील सदस्य, समाज, कार्यकर्ते आणि सर्व उपक्रमांत हिरीरीने सहभागी झालेल्या सदस्यांना दिले.
डॉ. विठ्ठल जाधव म्हणाले, “सुर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महिलांना शैक्षणिकसह अन्य क्षेत्रात शिकण्याची व आपल्या पायावर उभे रहाण्याची संधी आहे. त्याचा फायदा सर्व महिला-मुली यांनी घेतला पाहिजे. गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी येथील महिला सरपंचांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे.”
