भारताच्या उज्जल शैक्षणिक परंपरेचे दिवस परत यावेत – श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
पुणेः- भारत प्रारंभापासून खूप समृद्ध होता. कला, साहित्य, संस्कृती, वैद्यक शास्त्र या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाला मोठी परंपरा लाभली आहे. एवढेच नव्हे तर शिक्षण क्षेत्रात देखील भारत सर्वोच्च शिखरावर विराजमान होता. तक्षशीला, नालंदा यांसारख्या उज्ज्वल आणि जाज्वल्य शैक्षणिक परंपरेचे उदाहण आपण देऊ शकतो. कालांतराने विविध कारणांमुळे आपले हे स्थान आपण गमावून बसलो. ते स्थान परत प्राप्त करून भारताच्या उज्जल शैक्षणिक परंपरेचे दिवस परत यावेत, असे मत कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या ‘मी आणि सिंबायोसिस’ या आत्मकथानाचे प्रकाशन आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले, त्यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक प्रा.मिलिंद जोशी, दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे, संजीवनी मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, संस्थात्मक दृष्ट्या सिंबायोसिस आणि वैयक्तिक दृष्ट्या डॉ. शां.ब. मुजुमदार यांचा प्रवास बघितल्यास त्यात अद्वैत झाल्याचे दिसून येते. प्राध्यापकी करतांना विविध पातळ्यांवर शां.ब. मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील राजकारणाला सामोरे जावे लागले. त्या अप्रिय राजकारणाला कंटाळून डॉ. शां.ब.मुजुमदार यांनी स्वतःचीच शिक्षण संस्था उभारली. सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक संस्कृती एकाच छत्राखाली येऊन नांदत आहेत. नियती आणि संघर्ष यात सिम्बायोसिसच्या उत्पत्तीचे बीज रूजलेले आहे. मानवता धर्म स्वीकारून, वैश्विक दृष्टीकोन बाळगून सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजे.
यावेळी बोलताना डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले की, आपल्याला दैनंदिन आयुष्य जगत असतांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. काही अनुभव कालांतराने लुप्त होतात, तर काही अनुभव मनात घर करून राहतात. आज प्रकाशित झालेले माझे हे पुस्तक म्हणजे एका प्राध्यापकाची जीवनगाथा असून ती सिंबायोसिसच्या निर्मितीची कथा आहे. नैतिक मूल्यांवर आधारित ज्या व्यक्तीची आणि संस्थेची वाटचाल असते ती व्यक्ती आणि संस्था अमर होते. संघर्षाशिवाय आयुष्यात उत्कर्ष नाही, याची खूणगाठ मी मनाशी बांधली असून कुठलीही नवनिर्मिती किंवा उत्क्रांती होतांना संघर्ष अटळ असतो, हा निसर्गाचा देखील नियम आहे.
