Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

७० बेनामी मालमत्तेत अजित पवारांच्या बहिणी व मेहुणे पार्टनर – किरीट सोमय्या यांचा आरोप

सोलापूर : जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये त्यांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली? असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे. हे कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय, सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 सोमय्या म्हणाले की,  शिवानी जयचंद प्रा.लि आणि इंडिकॉम डेव्हलपर्स प्रा.लि कोण आहे? यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १०० कोटी रुपये किती वर्षांपूर्वी दिले? कशासाठी दिले? हे शरद पवारांना मान्य आहे का? अशा प्रश्नाची सरबत्ती त्यांनी केली. माझं शरद पवार यांना आव्हान आहे की, मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयालाही पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत. माझ्याकडे पुरावे आहेत. यातला एकपण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबाला दिलं.

किरीट सोमय्या म्हणाले, हे घोटाळे पोलिसांनी उघड करायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाही. हे पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून काम करत आहेत. पोलीसच सुपारी घेतात, पोलीस आयुक्तच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. हे सगळे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला ना. मी जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी हे करतोय, पण पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहे. ते लुटीसाठी करतात, मी ती लूट जनतेसमोर जनतेसाठी ठेवण्यासाठी काम करतो शरद पवार इतके वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ११ घोटाळेबाज ठाकरेंचे आता १७ झाले. ६ राखीव झालेत, हे वाढत चालले आहेत. यातील एकही घोटाळा केला नाही असं म्हणण्याची हिंमत ठाकरे-पवारांमध्ये नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकायुक्त, राष्ट्रीय हरित लवाद, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट सोमय्या जात आहे तर त्यात चूक काय?, असंही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply