भारतीय लष्कर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक – ब्रिगेडियर (निवृत्त) सुनील लिमये
पुणे : लष्करामध्ये जात-धर्म-पंथ असा भेदभाव केला जात नाही. केवळ प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते, त्यामुळे ते कोणत्या प्रांतातून आले आहेत, हे समजते. सैनिक हा एकच धर्म लष्करामध्ये पाळला जातो. त्यामुळे भारतीय लष्कर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे, असे मत सेनाधिकारी ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे विजयादशमीनिमित्त देशासाठी प्राणांची बाजी लावणारे पराक्रमी सेनाधिकारी ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त) यांचा विशेष सन्मान बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या हस्ते मॉडेल कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी सुनील लिमये यांच्या पत्नी अनघा लिमये, शाहीर हेमंतराजे मावळे, किरण पाटोळे, आनंद सराफ, गिरीष पोटफोडे, होनराज मावळे, कल्याणी सराफ, योगिनी पाळंदे, विक्रांत मोहिते, अमर लांडे आदी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांची लिमये यांना सपत्नीक औक्षण देखील केले. तिरंगी उपरणे, सन्मानचिन्ह, घरगुती मिठाई त्यांना भेट देण्यात आली. उपक्रमाचे यंदा २३ वे वर्ष होते.
सुनील लिमये म्हणाले, देशावर आतंकवादाचे मोठे संकट आहे. आतंकवाद म्हणजे केवळ बॉम्ब हल्ले, गोळ्या, बंदुका इतकेच नाही. तर, अन्नातून विषबाधा घडविणे, आर्थिक संकट, महत्वाची माहिती चोरण्याचे संकट, सायबर हल्ला अशा अनेक गोष्टींतून आतंकवाद वाढत आहे. यामध्ये तरुणाईची भूमिका महत्वाची असून आजच्या पिढीने मी आणि माझे इतक्यापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती जागरुक राहून कार्य करायला हवे.
शिरीष देशपांडे म्हणाले, युद्धाच्या कथा ऐकताना आपल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु त्यावेळी त्या सैनिकाची आणि त्याच्या कुटुंबाची अवस्था खूप वेगळी असते. त्यामुळे कायम आपण सैनिकांप्रती सन्मान ठेवायला हवा. आर्थिक मदतीपेक्षाही सैनिक व त्यांच्या कुटुंबांना चांगली वागणूक व सन्मानाची आवश्यकता आहे.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतीशील काम करण्याचा प्रयत्न सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भूमी आणि मातृभूमी यातील फरक जाणून घेण्याकरीता प्रत्येकाने सैनिकाचे जीवन समजून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. खळदकर बंधू यांनी सनई-चौघडा वादनाने सर्वांचे स्वागत केले.
