fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेवर पलटवार

बीड : पंकजा मुंडे यांनी भाषणात एक गोष्ट कबूल केली, त्या मंत्रिपद भाड्याने दिलंय हे बोलल्या. पण त्या मंत्री असताना बीड जिल्ह्यातील आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या असंख्य ऊसतोड मजुरांसाठी त्या मंत्री असताना न्याय देता आला नाही. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद त्यांनी कुणाला भाड्याने दिलं होतं का?, असा सवाल करीत धनंजय मुंडे यांनी पांकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.

सावरगावत भगवान गडावर दासरा मेळाव्यात भाजप नेत्या पांकजा मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी करीत भाषण केले.  यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्याने देणं, अशा पद्धतीने आरोप करणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांना काय म्हणावे हे त्यांचा प्रश्न आहे. पण सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का? हे त्यांनी सांगावे.

त्यांनी कुठलीतरी एक भूमिका घ्यावी

पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत? हे कळत नाही त्यांनी कुठलीतरी एक भूमिका घ्यावी. विरोधीपक्ष हा त्यांचाच पक्ष आहे. त्यांचाच पक्ष सरकार पाडायचा प्रयत्न करतोय. ईडी, सीबीआयपासून आयटीपर्यंत जेवढ्या काही केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या संस्था महाराष्ट्रपुरता केल्या आहेत. महाराष्ट्रात सरकार पाडायचा प्रयत्न केला जातोय. एकीकडे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षाने वाट्टेल ते प्रयत्न करायचे. दुसरीकडे सरकार पडणार आहे की नाही याच्या गोंधळात राहायचं. गोंधळात राहू नये. त्यांनी आजपर्यंत अभूतपूर्व संकटाच्या काळात सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा देखील प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

…तर तुम्ही केंद्राकडून मदत मिळवून द्यावी

आम्ही एवढी मदत जाहीर केलीय ते तुम्हाला कमी वाटत असेल तर आपण भाजपच्या सचिव आहात, अनेक राज्यांच्या प्रभारी आहात. तुमची जी ताकद आहे ती वापरुन केंद्रामधून बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला मदत मिळवून द्या. बाधित शेतकरी आनंदी होईल. आरोप करण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा करुन राज्याला वेगळी मदत मिळवून द्या, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading