Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

तळजाई प्रकल्पाचा प्रस्ताव दप्तरी दाखल होणार

पुणे: तळजाई टेकडीवरील हिल टॉप हिल स्लोपवरील नियोजित ‘जैवविविधता उद्यान’ प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी, विविध संस्था आणि लोकप्रतिनिधींचा विरोध लक्षात घेवून हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतल्याची माहिती भाजपच्याच एका स्थायी समिती सदस्याने दिली आहे. 

तळजाई टेकडीवरील हिल टॉप हिल स्लोपचे आरक्षण असलेली सुमारे 100 एकर जमिन प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेच्या ताब्यात आली आहे. यापैकी बहुतांश जमिनीचे संपादन झाले असून अद्याप काही जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या जागेवर जैववैविधता उद्यान उभारण्याचा कृती आराखडा (मास्टर प्लॅन) महापालिकेने तयार करून मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. तो स्थायीने एक महिना पुढे ठकलला आहे.

दरम्यान या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी, विविध संस्था, राजकीय पक्ष व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विरोध केला आहे. तळजाई टेकडीसह महापालिकेमध्येही या विरोधात आंदोलने झाली आहे. या प्रकल्पाला वाढता विरोध लक्षात घेवून हा प्रस्ताव दस्तरी दाखल करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. यासंदर्भात माहिती देताना स्थायी समितीचे भाजप सदस्य महेश वाबळे म्हणाले, या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांच्या विरोधात जावून भाजपला कोणताही प्रकल्प राबवायचा नाही. त्यामुळे आमची प्रकल्पाला विरोध हीच भुमीका आहे. त्यामुळे हा प्रस्ताव ज्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेसाठी येईल, तेव्हा तो दप्तरी दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे.

Leave a Reply