पुढील तीन ते चार दिवस राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार
पुणे:राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पुणे शहर आणि पुणे परिसरातील अन्य भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काल भारतीय हवामान विभागाकडून राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
दरम्यान, विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्यानं नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तर पुढील तीन ते चार दिवस राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
काल राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात केली होती. काल पुणे शहराच्या मध्य भागातील डेक्कन, कर्वेनगर, स्वारगेट, कात्रज, कोंढवा, हडपसर, केशवनगर, वारजे माळेवाडी या भागात जोरदार पाऊस पडला . अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्याच्या सर्व भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे.
आज राज्यातील पुणे, जुन्नर, डहाणू, रायगड आणि मोडक सागरच्या भागांत पाऊसाचा जोर जास्त असणार आहे. तसेच या सर्व भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. तसेच अहमदनगर शहरामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे.
