मिरासदारांच्या निधनाने साहित्यातील निखळपणाचे आनंदपर्व लोपले
साहित्य परिषदेत मिरासदारांना साहित्यिकांची आदरांजली
पुणे: अस्सल ग्रामीण बाजाच्या विनोदी कथा लिहून द मा मिरासदार यांनी कथेचे वर्तुळ व्यापक केले. ते लेखक म्हणून जितकें मोठे होते तितकेच त्यांचें माणूसपणही भावणारे होते. ते आनंदयात्री होते. त्यांच्या निधनाने साहित्यातील निखळपणाचे आनंदपर्व लोपले अशी भावना मिरासदारांच्या आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक आणि मसापचे माजी अध्यक्ष प्रा द मा मिरासदार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी होते. मिरासदारांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.
शि द.फडणीस म्हणाले,प्रसंगनिष्ठ विनोदाची श्रीमंती लाभलेले साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या वीसहून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठ रंगविण्याचा योग मला लाभला. साहित्याच्या शेजारी चित्रं हा शेजारधर्म आम्ही दोघांनी प्रत्यक्ष अनुभवला . अनेक वर्षे आम्ही एका बंगल्यात शेजारीच रहात होतो.
प्रा मिलिंद जोशी म्हणाले, अस्सल ग्रामीण बाजाच्या विनोदी कथा लिहून मिरासदारांनी मराठीतील विनोदी कथांचे वर्तुळ व्यापक केलें. ते अंतर्बाह्य निर्मळ आणि सच्चा माणूस होते. आपल्या राजकीय भूमिकेबाबत ठाम असलेल्या मिरासदारांनी वाडमयीन सौहार्द जपताना ती भूमिका कधीही आड येऊ दिली नाही. त्यांनी मराठी माणसांना खळखळून हसवले आणि भरभरून आनंद दिला त्यांच्या निधनाने निखळ पणाचे आनंदपर्व लोपले.
रामदास फुटाणे म्हणाले, ‘एक चांगला अस्सल लेखक आपल्यातून निघून गेला आहे. मिरासदार हे साहित्यातील चैतन्य होते.
मंगला गोडबोले म्हणाल्या, ‘मिरासदार शिक्षकी पेशात असूनही शिकविण्याचा अविर्भाव कधीही त्यांच्या लेखनात आला नाही.
न. म. जोशी म्हणाले, ‘मिरासदारांनी गंभीर विचार अवखळ आविष्कारातून आणि नर्म विनोदातून मांडला.
सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘बोलणे आणि लिहिणे या दोन्ही गोष्टींवर त्यांचे प्रभुत्व होते. ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही जीवन अनुभव कारुण्य आणि विनोद यांच्या साह्याने त्यांनी साहित्यातून मांडले.
रविमुकुल म्हणाले, ‘मिरासदारांनी निरागसता अखेरपर्यंत जपली.
सुनेत्रा मंकणी म्हणाल्या, ‘प्रेम, जिव्हाळा त्यांनी एकत्र कुटुंबात जपला तो त्यांच्या लेखनातही उतरला. घरात ते नेहमी तंद्रित असत. ते कृतार्थ जीवन जगले.
उद्धव कानडे, दीपक करंदीकर, श्याम भुर्के, सुनिताराजे पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
