‘सूर्यदत्ता’मध्येही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
पुणे : रंगीबेरंगी फुग्यांची आकर्षक सजावट… परिसरात वाजणारे मंगलमय संगीत… शिक्षकांच्या हातून विद्यार्थ्यांना मिळणारे गुलाबपुष्प… विद्यार्थी-शिक्षकांच्या चेहऱ्यावरील हसू… अशा आनंदमय वातावरणात बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्वच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत झाले. सरकारच्या सूचनेनुसार इयत्ता ८वी ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरु होणार असल्याने ‘सूर्यदत्ता’ परिवाराने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. सूर्यदत्ता नॅशनल स्कूल, सूर्यदत्ता पब्लिक स्कूल व सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजची दारे विद्यार्थ्यांसाठी खुली झाली.
सकाळपासून सूर्यदत्ता परिसरामध्ये उत्साही वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जवळपास दीड वर्षानंतर शाळा पाहिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेचे कर्मचारी व सेवकवर्ग त्यांचे उत्साहात स्वागत करत होते. कोविड संदर्भातील नियमावली समजून सांगण्यात आली. कोविड नियमांचे पालन करत वर्ग भरविण्यात आले. मास्क, सॅनिटायझिंग व योग्य अंतर महत्त्वाचे असल्याच्या सूचना वारंवार केल्या गेल्या.
कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य किरण राव व स्टाफ तसेच शाळेच्या वतीने शैला ओक, सुखविंदर कौर, सरिता नायर, मोनिका हजारे आदींनी पुढाकार घेतला. संस्थेच्या सचिव सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया उपस्थित होते.
संस्थेचे समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले की, कोविड काळानंतर पुन्हा तुम्हा सगळ्यांना भेटून चैतन्य प्राप्त झाले आहे. कोणतीही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांशिवाय अपूर्णच असते. मोठ्या काळानंतर विद्यार्थ्यांनी गजबजलेला शाळेचा परिसर पाहून आनंद होत आहे. नव्याने उगवलेला आजचा हा सूर्य येत्या काळात कायम प्रकाशमान राहील.”
