Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाच्या आठवणी मागे टाकून ‘स्कुल चले हम’

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन शाळा सुरू

पुणे : ओसंडून वाहणारा उत्साह… भिरभिरणारे डोळे… आणि मन मात्र कधी शाळेत पोहचणार या विचारात दंग… कुठे रांगोळी तर कुठे फुलांनी केलेले स्वागत.. हे चित्र आहे राज्याला शिक्षणाची दिशा देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील. आज तब्बल पावणे दोन वर्षांनी अनेक शाळा व महाविद्यालयाची घंटा वाजली. परस्पर भेटीचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

शाळेत आज वेगळीच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शाळेची घंटा फुलांनी सजविली होती. प्रवेशद्वारावर विद्यार्थींचे अनोख्या पध्दतीने स्वागत होत होते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय विद्यार्थ्यांनी स्विकारला. ऑनलाइन शाळेमुळे दुरावलेल्या मित्रांच्या भेटीचा आनंदही विद्यार्थ्यांना होता.

शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल याबाबत काहींना आनंद होता, तर काहींनी वह्यापुस्तकांचा सहवास मिळेल, धम्माल करता येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी आणि पालकांनी आवश्यक सूचना देण्यात येत होत्या. आम्ही सर्व ती काळजी घेत नियमांचे पालन नक्की करू, असे विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले. त्यांच्यासाठी शाळा सुरू रहाणे महत्वाचे असल्याचे दिसून येत होते.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या एकूण शाळांपैकी 95 टक्के शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी उपस्थिती 45 ते 50 टक्के होती. जिल्ह्यात सर्व ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा तसेच पालक सभांचे आयोजन करण्यात आले. यापूर्वीच विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading