Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

सायकल चालवण्याच्या उपक्रमाला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

पुणे : आपल्याला जर जवळच्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तरीही आपण लगेच गाडीचा वापर करतो. यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण तर होतेच परंतू आपल्या आरोग्याकडेही दूर्लक्ष होते. व्यायामासाठी चालणे, सायकल चालवणे या सवयींकडे खूप कमी लोक गांभीर्याने बघतात. ज्या लोकांना व्यायाम करणे, सायकल चालवणे आवडते असे अनेक लोक सुट्टीच्या दिवशी आपल्याला नेहमीच दिसतात. परंतू कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यायामासाठी, सायकल चालवण्यासाठी पुणेकरांना संधीच मिळाली नाही. परंतू रविवारी मात्र अनेक पुणेकरांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतलाच. त्याचबरोबर एक दिवस वाहनविरहित घराबाहेर पडण्याचा संदेश सुद्धा दिला. निमित्त होते ‘नो व्हेईकल सन्डे सायकल राईड’ (No Vehicle Sunday Cycle Ride) या उपक्रमाचे. बावधन सिटीझन फोरम आणि स्प्रॉकेट सर्व्हिसेस एल.एल.पी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाची संपूर्ण रूपरेषा स्प्रॉकेट सर्व्हिसेस या संस्थेच्या सारंग केतकर आणि त्यांच्या संघाने आखली होती. तसेच या उपक्रमामध्ये ४५ ते ५० लोकांचा सहभाग होता. सहभागी लोकांनी चांदणी चौक ते शनिवार वाडा व पुन्हा शनिवार वाडा ते चांदणी चौक असे अंतर सायकल चालवून पार केले. यामध्ये चांदणी चौक-पाषाण सर्कल- युनिर्व्हसिटी सर्कल-शनिवार वाडा असा मार्ग होता. या यावेळी बावधन सिटीझन फोरमचे दुष्यंत भाटीया, अतुल पाटील, मनिषा देव व स्प्रॉकेट सर्व्हिसेस एल.एल.पीचे सारंग केतकर आदी लोक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सायकल चालवण्याचे महत्त्व आणि फायदे पुणेकरांना पटवून दिले. त्याबाबत पुन्हा एकदा जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर लोकांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला.

 ‘बावधन सिटीझन फोरम’ या संस्थेतर्फे अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता, पर्यावरणाचे संवर्धन अशा अनेक उपक्रमांचा सहभाग आहे. त्यापैकी ‘सायकल चालवणे’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत लोकांना सायकल चालवण्याचे जास्तीत जास्त फायदे कळावे, प्रदूषण रोखणे, सायकल चालवण्याचे महत्त्व समजणे याबाबत जनजागृती करण्यात आली. याआधी महिन्याच्या प्रत्येक रविवारी ‘कोणतेही वाहन वापरू नये’ असा संदेश देण्यासाठी सायकल चालवण्याचे आवाहन करून हा उपक्रम राबविला जात होता. परंतू कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने हा उपक्रम केला नव्हता. अनेक दिवसांनी त्याच उत्साहात या उपक्रमाचा पुनश्च: हरिओम करण्यात आला.         

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading