Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात गरबा, दांडियावर बंदी; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : येत्या  ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती  शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये.

Leave a Reply