सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे घवघवीत यश
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी लोकसेवा तसेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रातील तीन विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील क्रमवारीत आपले स्थान प्राप्त केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी सुहास गाडे याने ३४९ वा, ओंकार पवार याने ४५५ वा तर अजिंक्य विद्यागर या विद्यार्थ्याने देशपातळीवर ६१७ वे स्थान प्राप्त केले आहे.
तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सुरज जगताप, नूतन पाटील, शुभम मदने, ज्योत्स्ना मुळीक, स्नेहल लाड, समर्थ क्षीरसागर, प्रियांका मिसाळ, अविनाश शेम्बटवड, वृषाली केसकर, पूजा भोईर,आनंद स्वामी आदींनी अ वर्ग अधिकारी म्हणून विविध पदांवर स्थान मिळवले आहे. तर वनसेवा परीक्षेत विलास चेंनुरी, वर्षा कोळेकर, पूजा पानसरे यांचीही अ वर्ग अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ब वर्ग अधिकारी म्हणून या केंद्रातील १९ जणांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रातील प्राध्यापक डॉ. चित्तरंजन दास यांच्यासह अन्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
याबाबत माहिती देताना स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. जयंत उमराणीकर म्हणाले, या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अभ्यासाला पूरक वातावरण, ग्रंथालय, पुस्तके तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशाचा आनंद आहे.
