वाहतुकीसाठी आवश्यक उर्जेच्या वापरासंदर्भातील दृष्टीकोन बदलायला हवा – नितीन गडकरी
पुणे : वाहतुकीसाठी आवश्यक उर्जेच्या वापरासंदर्भातील आपला दृष्टीकोन बदलण्याची आता वेळ आली आहे. वाहतुकीसाठी जीवाश्म इंधनांचा वापर कमी करीत इथेनॉल, मिथेनॉल, बायो सीएनजी, एलएनजी, एस सीएनजी ग्रीन हायड्रोजन अशा पर्यायी इंधनांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. याबरोबरच वाहतूक क्षेत्रातील कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन आज वाहतूक क्षेत्राला इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशनची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ (एसआयएटी २०२१) या प्रसिद्ध वाहन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
एआरएआयच्या वतीने आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स (एसएई) इंडिया व आंतराष्ट्रीय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या एसआयएटी २०२१ या परिषदेची ही १७ वी आवृत्ती होती. ‘रिडिफायनिंग मोबिलिटी फॉर फ्युचर’ ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. टाटा मोटर्स लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व एआरएआयचे उपाध्यक्ष राजेंद्र पेटकर, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसआयएटी २०२१ चे संयोजक डॉ. सुकृत ठिपसे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, “देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये वाहन उद्योग क्षेत्राचा वाटा हा ७.१% इतका आहे तर उत्पादन जीडीपीमध्ये हाच वाटा तब्बल ४९ % इतका आहे. या क्षेत्रामधून येणारे वार्षिक उत्पन्न पाहिले तर ते ७.५ लाख कोटी रुपये इतके असून त्याची निर्यात ही ३.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. भारताला जगातील प्रथम क्रमांकाचे ऑटोमोबाईल उत्पादन हब बनविण्याच्या दृष्टीने सरकारदेखील प्रयत्नशील आहे. याच मार्गावर पाऊल टाकत असताना पीएलआय सारख्या अनेक योजना देखील सरकार घेऊन आले आहे.”
आत्मनिर्भर ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी प्रोडक्टवर सरकारचा भर असून यामुळे जीवाश्म इंधन उत्सर्जन कमी करण्यास देखील मदत होणार आहे, याशिवाय या क्षेत्रात ४२ हजार ५०० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक येऊन ७.५ लाख नोक-यांच्या नव्या संधी सुद्धा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आज भारतात ८१ टक्क्यांपर्यंत लिथियम आयन बॅटरी मूल्य उत्पादित केले जाते मात्र यामध्ये अधिक संशोधन होऊन आणखी शाश्वत पर्यायांवर चर्चा आणि संशोधन होणे गरजेचे आहे. इस्रो, डीआरडीओ व आयआयटी सारख्या संस्थाबरोबर संशोधन करीत एआरएआय ने अॅल्युमिनीअम आयन, झिंक आयन व सोडिअम आयन बॅटरीसंदर्भात संशोधन करावे. यामध्ये स्वदेशी बनावटीची, कमी किंमतीच्या व जास्त कार्यक्षम बॅटरीवर व ईव्ही कॉम्पोनंटवर संशोधन व्हायला हवे.” शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशनची देखील आज मोठ्या प्रमाणात गरज असल्याचेही गडकरी त्यांनी नमूद केले.
