पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा -आदित्य ठाकरे
पुणे : मानव जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असून पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा आणि शहरे कार्बन न्यूट्रल करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियान 2.0 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, अभियान संचालक सुधाकर बोबडे, उपायुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, शहरात कार्बन उत्सजर्नाचे प्रमाण अधिक आहे. ऊर्जेचा अधिक वापरदेखील ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक होतो. त्यामुळे पर्यावरणात वेगाने बदल घडत असून दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षणाचे दीर्घकालीन नियोजन आणि ठोस कृती अपेक्षित आहे. शहरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीदेखील यादृष्टीने अनुकूल बदल अपेक्षित आहेत. शहरातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड आणि प्रदूषण कमी करण्याच्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.
सौर ऊर्जेचा वापर, हरित क्षेत्र वाढविणे, जल पुनर्भरण, विघटनशील कचऱ्याचा पुर्नपयोग अशा उपक्रमांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. शाळा-महाविद्यालयातून अपांरपरिक ऊर्जेच्या वापराबाबत माहिती देण्यात यावी. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संयत्र बसवावे. स्वच्छतेवर भर, दैनंदीन सवयीत बदल करून ऊर्जेची बचत आदी उपाययोजनांच्या माध्यमातून मोठा बदल घडवून आणता येईल. या कार्यात महिलांचा सहभागही वाढविणे गरजेचे आहे. उद्योग, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आणि नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी रहाणे गरजचे आहे.
ग्लोबल सिटीझन कार्यशाळेत प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आदींची सांगड घालून राज्यात पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक मजबूत करता येईल. त्यासाठी पुणे विभागाने चांगली सुरूवात केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविण्यात येत आहे. वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातही अशीच चांगली कामगिरी करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
