इंदिरा गांधींचा दूरदृष्टीकोन व खंबीर नेतृत्वामुळे बांगलादेशाची निर्मिती झाली – कॅप्टन प्रवीण डावर
पुणे : बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतर्गत बांगलादेश लिब्रेशन वॉर समितीचे समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर यांनी काँग्रेस भवन येथे बांगलादेश निर्मितीच्या संदर्भात माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘‘१९७१ साली स्व. इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाले आणि केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. काँग्रेसने १९७१ च्या निवडणुकीत ३८२ जागा जिंकल्या. पूर्व पाकिस्तान मध्ये पाकिस्तान सरकार बांगलादेशी लोंकावर अत्याचार करीत होते. लाखो बांगला देशीय त्यांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी भारतात आले. भविष्यात भारताला याचा त्रास होणार याचा विचार करून स्व. इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तानच्या विरूध्द ३ डिसेंबर १९७१ ला युध्द पुकारले. या युध्दामध्ये भारतीय सैन्यांनी फिड मार्शल मानेक्शा यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली आणि पाकिस्तानचा पराभव केला. ९३ हजार पाकिस्तानी सैनिक लेफ्टनंट जनरल नियाजीच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराला शरणागत झाले. बांगलादेशाची निर्मिती झाली. इंदिरा गांधींच्या दूरदृष्टी आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले आणि जगभर इंदिराजींच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली. १६ डिसेंबर २०२१ ला या युध्दाला ५० वर्ष पूर्ण होत आहे. आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने बांगलादेशी लिब्रेशन वॉरचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा.’’
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी कॅप्टन प्रविण डावर यांचा सन्मान पुष्पगुच्छ व शाल देऊन केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कर्नल सुरेश पाटील, सुभेदार मेजर हिरालाल बोरसे, सुभेदार मेजर शिवणेकर, माजी सैनिक पी. एन. राव, माजी सैनिक पंढरीनाथ ताकवले, माजी नायक सुभेदार मधुकर पायगुडे, सुभेदार मेजर टी. एम. सुर्यवंशी, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रविण करपे, रमेश सकट, प्रकाश पवार, साहिल केदारी, राहुल शिरसाट, यासीन शेख, भुषण रानभरे, रवि पाटोळे, मिरा शिंदे, सुंदरा ओव्हाळ, ज्योती परदेशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले व आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी मानले.
