fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कोरोना काळात राबलेल्या वादकांच्या हातांनी केले वाद्यपूजन

पुणे : वंदे मातरम संघटना कृत युवा वाद्य पथक, शिववर्धन वाद्य पथक आणि शिवसाम्राज्य वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध ढोल-ताशा पथकांच्या वाद्यांचे एकत्रित अभिनव वाद्यपूजन करण्यात आले. मंगळवार पेठेतील स्व-रूप वर्धिनीच्या सभागृहात झालेल्या वाद्यपूजनावेळी रमणबाग शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष सचिन जामगे,  ऍड. अनिश पाडेकर, स्वरूपवर्धिनीचे निलेश धायरकर, केतन कंक, अक्षय बलकवडे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात अविरतपणे झटणाऱ्या जिगरबाज हातांनी हे वाद्यपूजन झाले. नूमवि वाद्य पथक ट्रस्ट, श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, नादब्रह्म ढोल-ताशा व ध्वज पथक ट्रस्ट, नादब्रह्म ट्रस्ट, मातृभूमी प्रतिष्ठान, स्व-रूप वर्धिनी, रमणबाग युवा मंच ट्रस्ट, शौर्य वाद्य पथक, गजलक्ष्मी वाद्य पथक, ज्ञानप्रबोधिनी, अखिल मोहन नगर मित्र मंडळ ट्रस्ट, शिवसूर्य प्रतिष्ठान, रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट या पथकातील वादकांचा यात समावेश होता.

प्रसंगी वैभव वाघ म्हणाले, “कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ढोल-ताशांचा आवाज दुमदुमलेला नाही. मात्र, ढोल-ताशांवर सूर-ताल-लय पकडणाऱ्या या हातांनी कोरोना संकटकाळात जिगरबाज कामगिरी केली आहे. गरजूंना अन्नधान्य व वैद्यकीय मदत, प्लाझ्मादान मोहीम, बेड आणि औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन बँक, कोविड मृतांचा अंत्यविधी, लसीकरण मोहीम यामध्ये ढोल-ताशा पथकातील हजारो हातांनी भरीव योगदान दिले आहे. या सर्व पथकांच्या सामाजिक कार्याचा अहवाल लवकरच लिखित स्वरूपात मांडला जाणार आहे.”

“दरवर्षी हे वाद्यपूजन प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या हस्ते होते. मात्र, यंदा हे वाद्यपूजन अभिनव पद्धतीने करण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत लॉकडाऊन काळात अव्याहतपणे कार्यरत राहिलेल्या जिगरबाज पथकांच्या आणि वादकांच्या हस्ते हे पूजन झाले. अडचणीच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाण्याची सार्वजनिक गणेशोत्सवाची शिकवण अबाधित ठेवणाऱ्या विघ्नहर्ता बाप्पाचा कार्यकर्ता असलेली वादक सेना यंदा ढोलवादन करणार नसली, तरी सामाजिक कार्याचा निनाद कायम ठेवणार आहे,” असेही वाघ यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading