वेडेपणाला शिस्तीचे कोंदण लाभल्यास त्याचे ध्यासात रूपांतर होते – डाॅ. मोहन आगाशे

पुणेः- छंद आणि झपाटलेपण यात फरक आहे. छंद हा येता जाता फावल्या वेळेत करावयाचा उद्योग आहे. तर सर्वस्व विसरुन ज्या गोष्टी करता व्यक्ती झपाटलेली असते त्याचाच केवळ ध्यास धरते. या वेडेपणाला, झपाटलेपणाला शिस्तीचे कोंदण लाभल्यास त्याचे ध्यासात रूपांतर होते, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. 
 
डिंपल पब्लिकेशन तर्फे प्रकाशित आणि दूरदर्शन वृत्तनिवेदिका आणि व्याख्यात्या दीपाली केळकर लिखित ‘खेळ मांडीयेला’ गोष्ट भातुकलीच्या राजाची., मान्यवरांच्या भातुकलीची आणि भांड्यांची या पुस्तकाचे प्रकाशन आज आगाशे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी लेखक, कवी,गायक डाॅ.आशुतोष जावडेकर, भातुकलीचे संग्राहक विलास करंदीकर व्यासपीठावर उपस्थित होते. 
 
डाॅ.मोहन आगाशे म्हणाले की, भातुकलीत अवघे विश्र्वरुप सामावलेले असून या खेळात समग्र जीवनदर्शन घडते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता प्रत्येक मुलात मुलीचे अंश असतात आणि प्रत्येक मुलीमध्ये मुलाचे अंश  असतात. त्यामुळे भातुलकली हा केवळ मुलींच्याच खेळण्याचा खेळ आहे, असे विधान करणे धारिष्ट्याचे होईल. मानसशास्त्रात समोरच्याचे मन जाणून घेण्याकरिता ज्या फूटपट्ट्या सांगितलेल्या आहेत त्यात भातुकली खेळाचा देखील समावेश करावा, असे म्हणावसे वाटते. भातुकली खेळणा-या मुला-मुलींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यासाठी या फुटपट्टीचा नक्कीच उपयोग होईल. 
 
डाॅ.आशुतोष जावडेकर म्हणाले की, भातुकली केवळ खेळ नसून त्याला सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यीक, सांस्कृतिक असे अनेक आयाम आहेत. या सर्व आयामात भातुकली हा खेळ मूल्य संस्कार करणारा खेळ आहे. या खेळाद्वारे गट संघटन वाढीस लागते. जो हा खेळ खेळत असतो त्याच्या व्यक्तिमत्वाची चुणूक त्यात दिसून येते. तसेच मुलांना या खेळाद्वारे निर्मितीचाही आनंद मिळतो. भातुकली हा स्मरणरंजनाचे माध्यम असला तरी त्यात काळानुरुप बदल होणे अपेक्षित आहे. आजच्या मुला-मुलींचे विश्व फार वेगळे आहे. त्या विश्वाच्या जवळपास पोहचणारा भातुकली खेळ विकसीत झाला पाहिजे. बदलत्या काळातील मूल्ये त्यात आली पाहिजे. 
 
भातुकलीचे संग्राहक विलास करंदीकर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच लेखिका दीपाली केळकर यांनी पुस्तक निर्मीतीमागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार लेखिका दीपाली केळकर यांनी व्यक्त केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: