fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

‘महा आवास’ योजनेंतर्गत दर्जेदार घरकुले बांधली जावीत;समाजातील गरजू व्यक्तीलाच फायदा मिळावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: माणसाची अन्न, वस्त्र व निवारा ही मूलभूत गरज आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाचे घर बांधण्याचे स्वप्न असते. पुणे जिल्ह्याला एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. पुणे जिल्हा विकासाच्या कामामध्ये मागे राहू नये. केंद्र, राज्याच्या योजनांचा फायदा खरोखरच लाभार्थी असलेल्यांनाच मिळाला पाहिजे, या पध्दतीचे काम प्रशासनाने करावे. या विविध घरकुल योजनांतर्गत देण्यात येणारी घरकुले दर्जेदार असावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

‘महा आवास अभियान ग्रामीण’ अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे तालुके, ग्रामपंचायत, क्लस्टर, बहुमजली इमारत व गृहसंकुलासाठीचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती. भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटींपर्यंत पोहोचली आहे. या योजनेंतर्गत दीड लाखाचा निधी दिला जातो. मिळणारे अनुदान महागाईच्या काळात पुरेसे नाही. ते वाढविण्यासाठी प्रयत्न करु असे सांगून ते पुढे म्हणाले, काही संस्थानीही खूप चांगले काम केले आहे. काही ठिकाणी डेमो हाऊस पण झाले आहेत. शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त प्रकल्प करण्याकरिता सामाजिक बांधिलकी डोळयासमोर ठेऊन रेलफोर या संस्थेने ‘सीएसआर’च्या माध्यमातून चांगल्या प्रकारची घरे उभी करण्यास मदत केली आहे. रेलफोर संस्थेचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ते पुढे म्हणाले, या अभियांनांतर्गत खेड तालुक्यात चांगले काम झाले आहे. या योजनेतून एक उत्तम प्रकारची सुरवात झालेली आहे. लोकांना विश्वास वाटेल की शासनाच्यावतीने आपल्याला घर मिळायला लागले आहे. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी गवंडी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आली होती. गवंडी कामाचे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना यामुळे रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. पुणे, मुंबई शहरात म्हाडाअंतर्गतही घर बांधण्याचा कार्यक्रम हातात घेतला आहे. म्हाडाच्या कामांचा दर्जाही चांगला झाला आहे. नुकतेच बारामतीतही 276 घरांचा भूमीपूजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना, ग्रामपंचायतींना, संस्थांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट तालुके अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय भोर, खेड आणि जुन्नर तर राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार खेड, वेल्हे आणि मावळ तालुक्याला मिळाला.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार टाकवे बु,, भोलावडे व मदनवाडी यांना मिळाला तर राज्य पुरस्कृत अंतर्गत अंबवडे, वाशेरे व कोंडवळ यांना पुरस्कार मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून गुणवडीचे पी. एन. मिसाळ, वाडा येथील आर. एस. पाटील तर बोरीपार्थी-खानगाव येथील एन. एन. फुलारी यांची निवड झाली. तर राज्य पुरस्कृत अंतर्गत गार येथील एन. एन. फुलारी, शिनोलीचे अशोक शेवाळे, करी-उत्रोलीचे पी. के. पाटील यांची निवड झाली. विशेष पुरस्कारामध्ये सर्वात्कृष्ट वित्तीय संस्थेचा पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्रला तर सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार रेलफोर फाऊंडेशला मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading