प्रवाश्यांच्या सोईसाठी पीएमपीने पुणे स्टेशन ते लोणावळा, निगडी ते लोणावळा बससेवा सुरु करावी – नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांची मागणी

पुणे : गेले अनेक महिने कोविडजन्य परिस्थितीमुळे लोणावळा व पुणे शहराला जोडणारी लोकल सेवा अद्यापही सुरळीत सुरु झालेली नाही . त्यामुळे लोणावळा ,मळवली ,कार्ले-भाजे लेणी याठिकाणचा अनेक चाकरमानी , व्यापारी, विद्यार्थीवर्ग, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचारीवर्ग हा पिंपरी चिंचवड शहर , पुणे शहराशी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून या दोन्ही शहरांशी जोडला गेलेला आहे. या प्रवाश्यांच्या सोईसाठी पुणे स्टेशन ते लोणावळा तसेच निगडी ते लोणावळा बससेवा सुरु करावी अशी मागणी नगरसेविका  प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे आज  प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे मागणी केली.

प्रा. ज्योत्स्ना एकंबोटे यांनी पत्रात म्हटले आहे की,  निगडी ते कामशेत ही पी.एम.पी.एम.एलची बससेवा गेले अनेक वर्ष चालूच आहे ती पुढे फक्त मळवली व लोणावळा या दोन ठिकाणापर्यंत विस्तारित करणे गरजेचे आहे (रूट नं.३६८). लोकलसेवा कोविडजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नियमावलीमुळे अद्यापही सुरळीत नाही . त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे . यातील अनेक नागरिकांना आपल्या उपजीविकेसाठी पुणे शहरापर्यंत रोज दुचाकी अथवा चारचाकी वाहनांद्वारे यावे लागत आहे . या वाहनांद्वारे दैनंदिन प्रवास केल्यामुळे अनेक नागरिक , कर्मचारीवर्गाला आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत आहे . तसेच जे अनेक नागरिक दैनंदिन कामानिमित्त दोन्ही शहरात वाहनांनी येत असतात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक यंत्रणेवर अतिरिक्त भार येतो व पर्यायाने शहरांच्या प्रदूषण पातळीही वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे .


तरी या सर्व बाबींचा विचार करता आपल्यामार्फत पुणे स्टेशन ते लोणावळा तसेच निगडी ते लोणावळा बससेवा सुरु करण्यात यावी. ही बससेवा सुरु झाली तर
१. अनेक कर्मचाऱ्याना दैनंदिन कामासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
२. पुणे लोणावळा पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर या बससेवेचा लाभ होईल व पर्यायाने पी.एम.पी.एम.एलचे दरडोई उत्पन्न वाढेल.
३. लोणावळा ते पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे पुणे शहर , या शहरांच्या उद्योग व व्यापारवाढीसाठी फायदा होईल.
४. पुणे लोणावळा लोकलच्या माध्यमातून प्रवास करणारा प्रवासीवर्ग पी.एम.पी.एम.एलच्या बससेवेशी जोडला जाईल .

Leave a Reply

%d bloggers like this: