fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

अध्यासने ही लोकासने झाली पाहिजेत – कुलगुरु डॉ. नितीन करमळकर

पुणे :  वाचकाला खिळवून ठेवणारी भाषा आणि पुस्तक पूर्ण वाचण्यास प्रवृत्त करणारे लेखन आज झाले पाहिजे. आपण फक्त काव्य किंवा अभंग वाचतो. परंतु ती काव्य कशा प्रकारे आणि कोणत्या काळात झाली, त्याकाळातील समाजकारण धर्मकारण अशा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा अध्यासनात केलेला असतो. म्हणून अध्यासने ही लोकासने झाली पाहिजे. जेव्हा संतांवरील असे लेखन, अशी पुस्तके पुढे येतील आणि संत हे पुस्तकांतून लोकांमध्ये मिसळतील तेव्हा अध्यासने ही लोकासने होतील, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत नामदेव अध्यासन व नामदेव समाजोन्नती परिषद, शाखा पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या ६७१ व्या संजीवन समाधी सोहळ््यानिमित्त कसबा पेठेतील श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाच्या नामदेव मंदिरात ग्रंथ प्रकाशन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. डॉ. सुमंगला बाकरे लिखीत श्री संत जनाबाई या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. 
संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, नामदेव समाजोन्नती परिषदचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे, लेखिका डॉ. सुमंगला बाकरे, परिषदेचे माजी मुख्य विश्वस्त तु.पा. मिरजकर, परिषदेचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष संजय नेवासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राचे संचालक डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, शिल्पकार विवेक खटावकर, श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाचे अध्यक्ष रमेश मेहेर, नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके, विजय कालेकर, रजनीकांत निखळ, अक्षय मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. संत नामदेवांची सार्थ गाथा या ग्रंथाचे पुणे विद्यापीठातर्फे प्रकाशन होणार आहे. नामदेव समाजातील बांधवांनी याकरीता आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन डॉ.सदानंद मोरे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नामदेव समाजोन्नती परिषदेने ११ हजार रुपयांची देणगी दिली.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, जेव्हा वारकरी सांप्रदायात संत नामदेव महाराजांचे मुख्य कीर्तन असे तेव्हा संत जनाबाई त्याचे संचालन करीत असत. नामदेव महाराजांच्या संगोपनात जनाबाईंचा मोठे स्थान होते. त्याकाळात स्त्रियांना फारसे अधिकार नव्हते तेव्हा महाराष्ट्राच्या घराघरात जनाबाईंचे अभंग पोहचले होते आणि त्या अभंगातून स्त्रियांना धाडस देण्याचे काम त्यांनी केले होते. अशा स्त्री संतांचे चरित्र त्यांच्या काव्याचे मूल्यमापन होणे गरजेचे होते. ते लेखिका डॉ. सुमंगला बाकरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण केले आहे, असेही त्यांनी सांगितले. 
डॉ. सुमंगला बाकरे म्हणाल्या, बडोदा, कलकत्ता, मथुरा, दिल्ली अशा अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर या प्रवासात मी खूप काही शिकले. त्या प्रांतातील लोकांची श्रध्दास्थाने, संस्कृती, साहित्य, लोककला समजली. तेव्हा कळले की महाराष्ट्राच्या बाहेर देखील मराठी माणसाने आपली संस्कृती जपली आहे. जेव्हा संत जनाबाईंच्या काव्यावर त्यांच्या जीवन चरित्रावर लेखन करण्यास सुरूवात केली, तेव्हा अनेक अडचणी आल्या. परंतु मनात इच्छा असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात आणि मार्ग मिळत जातात. तसे मला मार्ग मिळाले आणि हा ग्रंथ मी पूर्ण करू शकले असे त्यांनी सांगितले. 
संजीव तुपसाखरे म्हणाले,संतांचे शिरोमणी म्हणजे नामदेव महाराज. अभंगांतून त्यांनी समाजप्रबोधन केले. त्यावेळी कोणतेही साधन नसताना संपूर्ण देशभर त्यांनी प्रबोधन केले. आजच्या काळात आपण त्यांचे अभंग देशाच्या घराघरात पोहचविले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले आणि सुभाष मुळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading