Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

‘लोकशाहीर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनाचे समग्र दर्शन श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

पुणे : कलावंत, विचारवंत आणि प्रतिभावंताला जात नसते. जातीचे वर्तुळ तोडणारे अण्णा भाऊ साठे खरे मानवतावादी होते. त्यांचे विचार पचवायचे असतील तर अंशत: का होईना त्यांच्या प्रमाणे जगता आले पाहिजे. महापुरुषांच्या वैचारिक, सांस्कृतिकवादाच्या बेरजेची देणगी देणारे ते देशातील पहिली व्यक्ती आहेत. कुठलेही सत्य न लपविता ‘लोकशाहीर’ या नाटकाद्वारे अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे समग्र दर्शन घडले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकशाहीर’ या दोन अंकी नाट्य संहितेचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त संवाद पुणे आयोजित, सानिध्य प्रकाशन प्रकाशित आणि ‘पोतराज’कार संपत जाधव लिखित ‘लोकशाहीर’ या नाट्य संहितेचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्थायी समिती सदस्य, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आणि लेखक संपत जाधव, सुरेश देशमुख, नाट्यगृह व्यवस्थापक सुनील मते उपस्थित होते.

आजकालच्या लेखकांमध्ये सच्चेपणा आढळत नाही, असे मत नोंदवून डॉ. सबनीस म्हणाले, जातीव्यवस्थेमुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झालेला आहे. जाती-जातीतील भेद विसरून प्रत्येकाला माणूस म्हणून जगविण्याची आज खर्‍या अर्थाने आवश्यकता आहे. अण्णा भाऊ साठे यांनी लेखणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून जातीचे वर्तुळ तोडले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीचा वारसा जाधव यांनी जोपासला आहे. ऐतिहासिक संदर्भाच्या दृष्टीने ही कलाकृती अभ्यासली जाऊ शकते, असे गौरवोद्गार त्यांनी ‘लोकशाहीर’ या नाट्यकृतीविषयी व्यक्त केले.
नाट्यलेखनाविषयी बोेलताना जाधव म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांना प्रत्यक्ष पाहिले नाही. ही नाट्यकृती रंगमंचावर आल्यावर अण्णाभाऊ मलाही कळतील. डॉ. सबनीस यांनी माझ्या साहित्यावर बोलावे ही माझी अनेक वर्षांची इच्छा होती, ती या दोन अंकी नाट्यकृतीच्या प्रकाशन सोहळ्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.
‘लोकशाहीर’ हे नाटक वर्षभरात रंगमंचावर आणण्याचा मनोदय व्यक्त करून संवाद पुुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पुणे शहरातील महापालिकेच्या इतर नाट्यगृहांचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा केला जातो, त्याचप्रमाणे अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचाही वर्धापन दिन साजरा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading