महाराष्ट्रातील दगडादगडाला पाझर फोडण्याचे काम पुरंदरेंनी केले – कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर
पुणे : ”एका शंभर वर्षांच्या विद्यापीठाचा गौरव करण्यासाठी 70 वर्ष जुन्या असणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना बोलावलं आहे, ही गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे,” असे गौरवोद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी काढले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरूवारी वयाची 99 वर्षे पुर्ण केली असून, त्यांनी शंभरीत प्रवेश केला आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र किर्ती सौरभ प्रतिष्ठान, पुणे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी महोत्सव समिती, पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात करमाळकर बोलत होते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे, उद्योजक पुनीत बालन, भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त अमित वसिष्ठ, अॅड. विशाल सातव, डाॅ. प्रसन्न परांजपे, अभिषेक जाधव, विनोद सातव आदी उपस्थित होते. डॉ. करमाळकर पुढे म्हणाले, ”महाराष्ट्रातील दगडादगडाला पाझर फोडण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. त्यांनी लोकांच्या नसानसामध्ये शिवचरित्र जागविण्याचे काम केले आहे.”
यावेळी बोलताना पुरंदरे म्हणाले, ”एका व्याख्यानमालेसाठी मुंबईत गेलो होतो. व्याख्यान झाल्यानंतर एक काॅलेजमधील मुलगी जवळ येऊन मला म्हणाली, तुम्ही शिवचरित्र खुप छान सांगता पण छत्रपतींच्या कुठल्या गोष्टींचे अनुकरण करता का? असे म्हणताच मी चक्रावलो. मला काही सुचले नाही. मी म्हटले याचे उत्तर मी तुम्हाला नंतर देतो. त्यानंतर मी बराच विचार केला. आणि त्यानंतर मी विचार करू लागलो अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांचे आपण अनुकरण करतो. छत्रपती आपल्या रक्तात नसानसात भिनायला हवेत. मी आजपर्यंत छत्रपतींप्रमाणे माझ्या जीवनात दिलेला शब्द व दिलेली वेळ या दोन्ही गोष्टी आयुष्यभर काटेकोरपणे पाळत आलो आहे. अहंमपणा बाळगू नका. नेहमी हसत रहा. आई-वडिलांची सेवा करा. सर्वांवर प्रेम करा. शिवचरित्र वाचा, शिवचरित्र तपासा, शिवचरित्राचे अनुकरण करा” असा संदेश शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिला. तसेच यावेळी बाबासाहेबांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणीही सांगितल्या.
