Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रंगावली व दीप मानवंदना

पुणे : वयाची ८० वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम, तब्बल ५ लाख किमी प्रवास, राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्त्या, जगभरात २५ हजार व्याख्याने, ३ कोटी रुपयांचा दानधर्म आणि आशियातील दुस-या क्रमांकाचे महानाटय जाणता राजा चे १२०० प्रयोग व १ कोटी प्रेक्षक असा थक्क करणारा प्रवास करीत वयाच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणा-या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भव्य रंगावली व ९९ दीप प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रारंभ शतकपूर्तीचा’ हा भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन सदाशिव पेठेतील पेरुगेट भावे स्कूल प्रशालेमध्ये करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटचे अध्यक्ष एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, दादरानगर हवेली मुक्ती संग्रामातील बाबासाहेबांचे सहकारी वसंतराव प्रसादे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी आॅनलाईन पद्धतीने यावेळी सहभाग घेतला.

प्रा. अक्षय शहापूरकर आणि श्रीरंग कलादर्पणच्या ७ कलाकारांनी २७ तासात २० बाय १५ फूट रंगावली साकारली. रंगावलीमध्ये बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र, त्यांचे शिवचरित्र प्रसाराचे पैलू दर्शविण्यात आले आहेत.

भूषण गोखले म्हणाले, इतिहासातून काय शिकायचे हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. इतिहासातून मिळणा-या धडयांतून भारताला कसे अधिकाधिक सक्षम करता येईल, याचा विचार आपण करायला हवा. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे चालता-बोलता इतिहास आहे. शिवरायांविषयी पुस्तके, लेखन व भाषणांमधून ते आपले जीवन व्यतीत करीत आहेत. स्वराज्य आणि सुराज्य याच्या अनेक गोष्टी याच इतिहासातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत.

वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे ; समाधानी नाही 

महत्वाकांक्षी व हौशी माणूस कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या ९९ वर्षात परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करीत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखन करुन स्वत: काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, त्यामुळे वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे, पण समाधानी व तृप्त नाही. मला भारतातच पुर्नजन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे, अशी भावना पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आॅनलाईन माध्यमातून व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading