Big Nesw- बँक बुडीत निघाल्यास खातेधारकाला मिळणार पाच लाख रुपये
नवी दिल्ली : जर बँक बुडली तर ग्राहकांना 90 दिवसात बँक ठेवींवर पाच लाख रुपयांचा विमा मिळेल, असा महत्वपूर्ण निर्णय आज कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मोदी सरकारने बँक खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवी विमा आणि पत हमी निगम बिल (Deposit Insurance Credit Guarantee Corporation Bill ) कायद्यातील सुधारणांना मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे 2021 च्या अर्थसंकल्पात या विषयी घोषणा करण्यात आली होती.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. सीतारमण म्हणाल्या, विमा आणि पत हमी निगम बिल, 2021(DICGC) ला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विम्याची मर्यादा वाढवेल आणि त्याअंतर्गत 98.3 टक्के बँक खातेधारक संरक्षण मिळू शकेल. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू असणार आहे.
… तर ग्राहकांना पाच लाख रुपयांचा विमा
जर बँक बुडली तर ग्राहकांना 90 दिवसांत बँक ठेवींवर पाच लाख रुपयांचा विमा मिळेल. बँका बंद झाल्यास किंवा पैसे काढण्यास ग्राहकांवर बंदी घातल्यास त्यांचे 5 लाख रुपये सुरक्षित ठेवण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार डीआयसीजीसी बिल सादर करेल. या हालचालीमुळे ठेवीदारांना त्यांच्या आर्थिक गरजा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल. बँका अपयशी ठरल्यास अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी DICGC कव्हरसाठी सहज आणि कालबद्ध मदत करेल, असंही आश्वासन दिल आहे.
