Karnatak – बसवराज बोम्मई होणार मुख्यमंत्री
बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण ? या प्रश्नावर राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागलेला आहे. आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोम्मई यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
बसवराज बोम्मई हे बी.एस. येडियुरप्पा यांच्यासारखेच ताकदवान लिंगायत नेते आहेत. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करु नये, असं म्हटलं होतं. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
बसवराज बोम्मई 2008 मध्ये जनता दलातून भाजपमध्ये आले होते. यापूर्वी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद होतं. ते इंजिनिअर असून त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काही दिवस काम सुरु केलं होतं. बसवराज बोम्मई दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. तर, तीन वेळा हावेरी जिल्ह्यातील शिगांव मधून ते आमदार झाले आहेत. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर भाजपचा हा लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करुन संतुलन साधण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
