Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने जागा शोधा – अजित पवार 

सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम आदि उपस्थित होते. यावेळी पवार यांनी माळवाडी येथील पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या.

भिलवडी बाजारपेठेची बोटीतून पाहणी, कवलापूर निवारा केंद्राला भेट

भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. तसेच मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नेहरू हायस्कूल मध्ये पूरग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रास भेट देवून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

सांगली शहरातील स्टेशन चौक व दामाणी हायस्कूल येथे निवारा केंद्रास भेट

पुराने बाधित झालेल्या सांगली शहरातील स्टेशन चौक परिसराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली. .

यावेळी जयंत पाटील म्हणाले, पूरपरिस्थिती नियंत्रण करण्यासाठी धरणक्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांचे तातडीने प्रशासनामार्फत स्थलांतरण करून त्यांना सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अन्न, पाणी याची मोफत सोय करण्यात आली आहे.

राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पलूस तालुक्यातील जवळजवळ 22 गावे पूराने सातत्याने प्रभावित होतात. व्यापार, बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, पिके, व्यापार यांचे नुकसान झाले असून बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यातील काही गावे पूररेषेत येतात त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे सांगून पूरग्रस्ताना मदत करावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading