Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बीडीडी चाळ वासियांची स्वमालकीच्या गृह स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला अखेर मुहूर्त

१९५ चाळींचा होणार पुनर्विकास

मुंबई :  वरळी येथील ब्रिटीश कालीन बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि.२७ जुलै रोजी होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

दक्षिण आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प

दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे. वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर  जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. सदरहू चाळींचा पुनर्विकास करुन सदरहू चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकीहक्काने देण्यासाठीचा तसेच सदरहू ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टी धारकांप्रमाणे २६९ चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर  या योजनेद्वारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार आहेत. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. पुनर्विकास प्रकल्प टप्याटप्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाश्यांना प्रकल्प जागेजवळ असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. नायगांव व ना. म. जोशी मार्ग येथील पुनविकास प्रकल्प ७ वर्षात तर  वरळी येथील प्रकल्प ८ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

बीडीडी चाळीला १२२ वर्षांचा इतिहास

साधारणतः १९२० च्या दरम्यान ब्रिटिशांनी या बीडीडी चाळी बांधल्या. दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना ठेवण्यासाठी या चाळी वापरण्यात आल्या . स्वातंत्र्यानंतर जेव्हा लोकल रेल्वे सुरु झाली, त्यानंतर या भागाकडे लोकांचे येणे जाणे वाढले. या पार्श्वभूमीवर सर जॉर्ज लॉईड यांनी गृहनिर्मिती व विकासाची मोठी योजना तयार केली आणि या योजनेची अंमलबजावणी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडी च्या माध्यमातून करण्यात आली. मुंबई राज्याच्या तत्कालीन समाजव्यवस्थेत कामगार वर्गाचे आश्रयस्थान अशी बीडीडी चाळींची त्याकाळी ओळख होती. वरळी येथील बीडीडी चाळीत असलेले जांभोरी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या सभा गाजल्या होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading