Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

कवितेतून प्रकटावे वास्तवाचे गीत : डॉ. रामचंद्र देखणे

पुणे : “झाडाची मुळे जमिनीत खोलवर पसरून पाणी शोषून घेतात, तशी अनुभवाची पाळेमुळे खोलवर रुजावीत. जाणिवेतून लिहिलेले साहित्य पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देत असते. कवीच्या जाणिवा भक्कम असाव्यात. विश्व जागवण्याचे आणि वास्तवाला मांडण्याचे गीत कवीच्या अंत:करणातून प्रकट व्हायला हवे,” असे विचार साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

प्रा. अशोककुमार पगारिया लिखित, वेदांत प्रकाशन प्रकाशित ‘कथा कोरोनाची, लढा कोरोनाशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. प्रसंगी साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवडचे शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, कवी चंद्रकांत वानखेडे, डॉ. ललित धोका, वेदांत प्रकाशनचे सुनील गायकवाड, सचिन बेदमुथा, रुचिरा सुराणा, प्रा. प्रकाश कटारिया, विजय पारख, नितीन चोपडा, राजेंद्र धोका, प्रकाश पगारिया, भवरीलालजी खिंवसरा, अभय बोथरा, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “डॉ. पगारिया यांनी कोरोनाचे वास्तव कवितेत मांडले आहे. त्यांच्या कविता वास्तवाशी, सामाजिक जाणिवांशी जोडल्या आहेत. गेल्या दीड वर्षातील सामाजिक जीवनाचे भावदर्शन त्यांनी घडवले आहे.” प्रा. पगारिया यांनी काव्यसंग्रह नुकत्याच निधन पावलेल्या भगिनी विजयाबाई बेदमुथा यांना समर्पित केल्याचे सांगून त्यांचे भाचे सचिन बेदमुथा ,सौ कविता बेदमुथा व श्रीमती छाया बेदमुथा यांना हा काव्यसंग्रह प्रदान केला.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश रोकडे म्हणाले, “हा काव्यसंग्रह प्रतिभा आणि संवेदना यांचा संगम आहे. सनदी लेखापाल असलेले पगारिया साहित्यिक म्हणून उत्तम लेखन करताहेत. कोरोनासारख्या गंभीर विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत उत्कृष्ट काव्याविष्कार शब्दबद्ध केले आहेत. वास्तविकतेला सामाजिक जाणिवेची जोड देत केलेले लेखन हृदयस्पर्शी आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading