Rain Update – चिपळूण पाण्याखाली, पूरग्रस्तांसाठी एअरलिफ्ट

चिपळूण : कोकणात गेल्या २४ तासांत पावसाने रौद्ररुप घेतले आहे. रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला असून संपूर्ण चिपळूण या पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. शहरातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून बाजारपेठाही पाण्याखाली गेल्या आहेत. जराही विश्रांती न घेता कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कराड रोड मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणखी नुकसान होणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याहून एनडीआरएफची तुकडी चिपळुणात दाखल झाली आहे.

चिपळूणमधील पूरपरिस्थिती लक्षात घेत एनडीआरएफच्या दोन टीम आधीच त्याठिकाणी पाठवल्या आहेत. या दोन्ही टीम चिपळूणमध्ये पोहोचल्या असून त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम सुरु केलं आहे. चिपळूणमधील पुराची स्थिती लक्षात घेता आणखी दोन टीम तेथे पाठवण्यात येणार आहेत. मध्यरात्रीपर्यंत एक एक टीम चिपळूण आणि खेडमध्ये दाखलं होतील. आणखी मदतीची गरज भासल्यास राज्य सरकारची बातचित करुन आणखी टीम आवश्यकतेनुसार पाठवल्या जातील, अशी माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे.

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. तर वाशिष्टी, शिव नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. अनेक घरांमध्ये हे पुराचे पाणी शिरल्याने शेकडो लोक घरातच अडकून पडले आहेत. तसेच पुराचा फटका दुकानांनाही बसला असून शहरातील अनेक भागांत बाजार पेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट परिसरात पाणी भरले आहे. त्याचबरोबर काजळी नदीलाही पूर आल्याने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील बाजारपेठेतही पाणी भरले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: