पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी, आता पेन्शनस्लिप मिळणार व्हॉट्सअॅपवर
दिल्ली : पेन्शनधारकांच्या सोयीसाठी बँकांच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच बँका पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन स्लिप व्हॉट्सअॅपवरही पाठवण्यास प्रारंभ करणार आहेत. सध्या बँका पेन्शनधारकांना एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली जाते. परंतु केंद्र सरकारच्या आदेशानुसार बँकांकडून पेन्शन धारकांना पेन्शन स्लिप व्हॉट्सअॅपवरही पाठवली जाणार आहे.
एका अधिकृत आदेशानुसार, केंद्र सरकारने बँकांना बँक खात्यात निधी मिळाल्यावर एसएमएस आणि ईमेल व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया अॅप्लिकेशन्सचा वापर करून निवृत्तीवेतनाच्या स्लिप्स पाठविण्यास सांगितले गेले होते. आदेशानुसार पेन्शनधारकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. निवृत्ती वेतन आणि पेन्शन कल्याण विभागाने यासंदर्भात एक आदेशही जारी केलाय. पेन्शन स्लिपमध्ये मासिक पेन्शन, जमा केलेली रक्कम आणि कर कपात इत्यादींचा संपूर्ण तपशील असणार आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात पेन्शन देण्यासाठी बँकांच्या केंद्रीय निवृत्तीवेतन वितरण केंद्रांची (सीपीपीसी) बैठक झाली, ज्यामध्ये पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर चर्चा झाली. आदेशानुसारच बैठकीतच बँकांना बँकांकडून मान्य करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅपवरून पेन्शन स्लिप पाठविण्यासारखे कल्याणकारी पावलं उचलण्यास सांगण्यात आले आहे.
