शिक्षणाला नैतिक मूल्यांची, निःस्वार्थ सेवाभावाची जोड आवश्यक -डॉ. दत्ता कोहिनकर

पुणे : “आयुष्यात कितीही मोठे झालात, तरी अध्यात्माशी जोडून राहा. शिक्षणाला नैतिक मूल्यांची, निःस्वार्थ सेवाभावाची जोड द्या. ध्यानधारणा करा. चांगल्या संस्कारांना अंगिकारा. पैसे कमवणे मुख्य हेतू नसून, उत्तम माणूस म्हणून घडणे महत्वाचे आहे. निस्वार्थी भावनेतून काम करणाऱ्या लोकांना यश हमखास मिळते,” असे प्रतिपादन विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख, माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता कोहिनकर बोलत होते. प्रसंगी अशोक लेलँड लिमिटेडचे माजी उत्पादन प्रमुख अच्युत मेढेकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, ‘पीजीडीएम’चे प्रमुख प्रा. हर्षद भडंगे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्य हस्ते डॉ. दत्ता कोहिनकर यांना समाजातील लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल ‘प्रोफेसर इमेरिटस’ ही पदवी प्रदान करण्यात आली. या अभ्यासक्रमामध्ये प्रियंका सिन्हा प्रथम, तर संस्कृती मिश्राने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदक प्रदान करण्यात आले. डेलॉइट कन्सल्टिंगचे स्ट्रॅटेजी कन्सल्टंट प्रणव नाईक यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन बैठकीद्वारे संबोधित केले.
डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, “देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपण पेरतो, ते उगवते. त्यामुळे कितीही पदव्या घेतल्या, मोठमोठ्या पदांवर पोहोचलो. तरी आपले आई-वडील, शिक्षक यांच्याप्रती कायम आदर ठेवला पाहिजे. त्यांच्या कष्टामुळेच आपण इथवर आलेलो असतो. आपल्या कामात प्रामाणिकपणा, सचोटी, सातत्य, नम्रता असायला हवी.”
अच्युत मेढेकर म्हणाले, “सूर्यदत्ता संस्था केवळ चांगले व्यवस्थापकच घडवत नाही, तर एक उत्तम व्यक्तिमत्व घडवत आहे. भारताचा चांगला नागरिक बनून समाजाच्या, देशाच्या हितासाठी उत्तमोत्तम काम करत राहावे. आपल्यातील नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव जागृत ठेवून काम करत राहावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, चांगला माणूस घडविण्यासाठी सूर्यदत्ता परिवार आणि डॉ. संजय चोरडिया घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख, कौशल्याभिमुख विद्यार्थी येथून बाहेर पडत आहेत, ही उद्योग जगतासाठी उपयुक्त बाब आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: