भगवान गौतम बुद्धांचे विचार अखंड प्रेरणेचा स्रोत -शरद गोरे

पुणे : “भगवान गौतम बुद्ध प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांतून मिळते. त्यांनी सांगितलेली चार सत्ये आणि अष्टांगिक मार्गाचे अनुसरण केले, तर आपले जीवन आनंदी होईल. कोरोनाच्या कठीण काळात सकारात्मक राहण्यासाठी, या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी बुद्धांचे विचार अंगीकारावेत,” असे प्रतिपादन साहित्यिक व इतिहास अभ्यासक शरद गोरे यांनी केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ‘नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह’अंतर्गत आयोजित प्रतिभावंतांच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी शरद गोरे बोलत होते. यावेळी ‘गौतम बुद्धांचे सकारात्मक विचार’ या विषयावर शरद गोरे यांचे व्याख्यान झाले.
प्रसंगी ‘सूर्यदत्ता’तर्फे शरद गोरे यांना गौतम बुद्धांच्या नावाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. अक्षित कुशल आदी उपस्थित होते. पुढील व्याख्यान ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे होणार आहे.


शरद गोरे म्हणाले, “बुद्धाचे तत्त्वज्ञान जीवनाला दिशादर्शक आणि मौलिक आहे. मनाला एकाग्रतेचा, शांतीचा संदेश देणारा बुद्धाचा विचार अंगिकारला पाहिजे. निरपेक्ष आत्मपरीक्षण, निःस्वार्थ सेवाभाव जपला पाहिजे. माणूस विनयशील, करुणाशील असायला हवा. कोरोना काळात अनेक ठिकाणी माणुसकी जपल्याचे, तर काही ठिकाणी माणुसकी सोडून केवळ स्वार्थापोटी स्वतःच्या झोळ्या भरण्याचे काम पाहायला मिळाले. आभासी जगण्यापलीकडे जाऊन वास्तवाचे भान जपत समाजहिताचे काम व्हावे. वंचित, पीडित, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याला प्राधान्य असावे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्तामध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. विचारांचे आदानप्रदान व्हावे, प्रतिभावंतांचे मार्गदर्शन लाभावे, या उद्देशाने नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्हअंतर्गत ही व्याख्यानमाला होत असून, साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना ऐकण्याची संधी दर महिन्याला मिळणार आहे. ही व्याख्याने प्रत्यक्ष, तसेच फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह होणार आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: