नियमांनुसार 12 आमदारांचं निलंबन – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात झालेल्या गोंधळाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बोलताना आमच्या सदस्यांकडून कोणतही गैरवर्तन झालं नसल्याचं आतापर्यंतच्या अनुभावाच्या आधारे सांगतो, असं म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी विचारलं असता फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, असं म्हटलं आहे. मी, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील 30 वर्षांपेक्षा अधिक काळ आमदार आहोत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 37 वर्ष आमदार आहेत. भास्करराव जाधव यांनी त्या दिवशी घडलेला प्रकार रेकॉर्डवर आणलं आहे. नियमांनुसार 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे, असं अजित पवार म्हणाले. आज पुण्यात अजितदादांनी नेहमीप्रमाणे कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
निष्काळजीपणा करु नका मास्क वापरा
पुण्यात 607 रुग्ण म्युकरमायकोसिस आहेत. ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत ते लोक मास्क घालत नाहीत. परदेशात ज्या ठिकाणी दोन डोस घेतल्यानंतर मास्क न वापरण्याची मुभा देण्यात आली होती. तिथं पुन्हा मास्क लावायला सांगायला लागला. अनेकांनी दोन डोस घेतले म्हणून मास्क वापरणं बंद केलं. त्यांना कोरोना झाला आणि दुर्दैवानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे पुणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांना माझी विनंती आहे की निष्काळजीपणा करू नका मास्क वापरा, असं ते म्हणाले. पुण्याचा मृत्यूदर 1.6 टक्के आहे, मात्र, पुण्यात ससून रुग्णालयात अनेक ठिकाणचे रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळं दर जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोना निर्बंधानुसार 4 नंतर सगळं सरसकट बंद झाले पाहिजे, असे आदेश पोलिसांना दिले असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पुण्याचा ऑक्सिजन पुरवठा वाढवला आहे. हेच निर्बंध कायम असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. पर्यटन स्थळी गर्दी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते तिकडे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यास आल्याचे त्यांनी सांगितले
पेट्रोल दरवाढीबद्दल विचारलं असता पेट्रोल आणि डिझेल वरचे राज्याचे टॅक्स फडणवीस सरकारने जे आकारले होते तेच टॅक्स लावले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. फोन टॅपिंग प्रकरणाच्या पोलीस महासंचालकांच्या मार्फत होणाऱ्या चौकशी बद्दल विचारलं असता नाना पटोले यांनी जे आरोप केले फोन टॅपिंग बद्दलचे त्याची माहिती घेतली तर त्यात तथ्य असल्याचं समोर आलंय, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, “जसं राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, तसाच देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकार आहे. मोदींनी कुणाला घ्यावं, कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याचं कारण नाही.”
भारती पवार पूर्वाश्रमी राष्ट्रवादीच्याच आहेत. त्या आदिवासी असून डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना घेतलेलं दिसतंय. कपिल पाटील आग्री समाजाचे आहेत. तेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. आम्हीच त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं. त्यांना संधी मिळाली. नारायण राणे कोकणातील नेते आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते पूर्वी काँग्रेसचे नेते होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही संधी देण्यात आली. त्यानंतर डॉ. भागवत कराड त्यांना संधी दिली. तेही ओबीसीच आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
राज्य शासनापाठोपाठ महापालिकेनेही नवीन आदेश काढत पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारी सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत उघडी राहणार आहेत. तसेच अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु असणार आहे. मात्र, ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंदच राहणार आहेत.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट – सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी चारनंतर तसेच शनिवार व रविवार रात्री११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा देता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने ही केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु आहेत . तसेच सकाळी ५ ते ९ या वेळेत आऊटडोअर खेळ खेळता येऊ शकणार आहेत. तसेच व्यायामशाळाही पाच दिवस सुरू आहेत . ई-कॉमर्स, कृषी संबंधी सर्व सेवा-व्यवसाय सुरू ठेवता आहेत. संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली
