Friday, September 4, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘पीके’ चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे

पुणे : राजकुमार हिरानी ( Rajkumar Hirani) यांच्या गाजलेल्या ‘पीके’ (PK) या हिंदी चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे ( NFAI) प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे दालन आणखी समृद्ध झाले आहे. राजकुमार हिरानी यांचे गेल्या काही वर्षातील भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचे आहे. स्वता; राजकुमार हिरानी यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज सुपूर्द केल्या.

राजकुमार हिरानी यांनीच लेखन, संपादन आणि दिग्दर्शन केलेला ‘पीके’ चित्रपट म्हणजे भारतीय समाजातील राजकीय प्रहसनाचा उत्तम नमुना आहे. याशिवाय विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर सहनिर्मिती केलेल्या ‘पीके’ चित्रपट हा सेल्युलॉइड मध्ये चित्रित केलेल्या भारतातील शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक प्रमुख चित्रपट आहे.
राजकुमार हिरानी यावेळी म्हणाले, “निगेटिव्ह्ज टिकवणे महत्त्वाचे आहे आणि ते पुण्यात एनएफएआयमध्ये जतन केले जातील याबद्दल मला फार आनंद होत आहे. चित्रपट जपले पाहिजेत हे सुनिश्चित करणे हे एक निर्मात्याचे कर्तव्य आहे आणि मी सर्व चित्रपट निर्मात्यांना या महत्त्वपूर्ण कारणासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला समर्थन करण्याचे आवाहन करतो. ”

राजकुमार हिरानी यांच्याच यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (२००३), ‘लगे रहो मुन्नाभाई’ (२००६), आणि ‘थ्री इडियट्स’ (२००९) या तिन्ही चित्रपटांचे जतन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने यापूर्वीच केले आहे.
पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असलेले राजकुमार हिरानी आपल्या चित्रपटांद्वारे हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांची मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ‘पीके’ चित्रपटातील पृथ्वीवर अवतरलेल्या परग्रहवासीचे विक्षिप्त ‘व्यक्तिमत्व’ जगात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा कसा ‘वेध’ घेते हे त्या चित्रपटात हिरानी यांनी मोठ्या कल्पकतेने विशद केले आहे.
‘पीके’ च्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज बरोबरच सुमारे ३०० कैन्स एवढ्या या चित्रपटाच्या रशेस आणि ३ इडियट्स चित्रपटाच्या आउटटेक्स संरक्षणासाठी सोपविण्यात आल्या. पोस्टर, लॉबी कार्ड आणि हिरानी दिग्दर्शित चित्रपटांचे छायाचित्र असलेले मोठे पेपर मटेरियल सुद्धा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

याप्रसंगी राजकुमार हिरानी यांचे सहर्ष स्वागत करताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, “राजकुमार हिरानी आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा ‘स्नेह’ वृद्धिंगत राहील असाच आमचा प्रयत्न आहे. यापूर्वीही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने त्यांचे काही चित्रपट जतन करून ठेवले आहेत. ‘पीके’ चित्रपट जतन करण्याची आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे कारण तो सेल्युलॉइड मध्ये चित्रित करण्यात आला आहे.” भारतात चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात २०१३ ते २०१४ या काळात ‘सेल्युलॉइड’ ते ‘डिजिटल’ असे स्थित्यंतर घडले त्यामुळे ‘पीके’ सारखा चित्रपट जतन करणे आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे असेही मगदूम यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading