एकनाथ खडसे यांना ED चा दणका; जावई गिरीश चौधरी यांना अटक
मुंबई : भाजप मधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडी (ED)ने आज एक मोठा दणका दिला आहे. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे.
पुण्यातील भोसरी एमआयडीसी मधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना महसुल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या व्यवहाराची चौकशी समितीमार्फत चौकशी केली. या चौकशी समितीने खडसे यांना क्लिन चीट दिली होती. मात्र, हा अहवाल विधानसभेत शेवटपर्यंत सादर करण्यात आला नाही.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी व त्यांच्या पत्नी मंदाकिनी चौधरी यांच्या बँक खात्यात एका दिवसात वेगवेगळ्या कंपन्यांमधून काही कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते. या सर्व शेल कंपन्या होत्या. यातील एका कंपनीचा पत्ता हा पुजेचे सामान विक्री करणार्या दुकानाचा आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच व्यवहारात मनी लाँड्रिंग झाला असल्याच्या संशयावरुन ईडीने चौकशी सुरु केली होती. ईडीच्या अधिकार्यांनी काल गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची सलग १३ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यामुळे एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का आहे.
