12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन
पुणे : राज्याच्या दोन दिवसीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. पण पाहिलाच दिवस वादळी ठरला असून तालिका अध्यक्षा भास्कर जाधव यांना भाजपाच्या 12 आमदारांनी अपशब्द वापरले. त्या कृत्याच्या निषेधार्थ, त्या आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनाला भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक ,पर्वती चे सरचिटणीस गणेश घोष, महापौर मुरलीधर मोहोळ ,पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून देखील, या आघाडी सरकारने केवळ दोनच दिवसाचे अधिवेशन घेतले. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. काल मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणाची आत्महत्या, या सर्व गोष्टींचा जाब विचारणार्या 12 आमदाराचं निलंबन करण्यात आल आहे. मात्र हे निलंबन तालिका अध्यक्षा भास्कर जाधव यांना अपशब्द वापरल्याने केल्याचे सांगण्यात आले. पण आमच्या आमदारांनी कोणत्याही प्रकाराचे अपशब्द वापरले नसून केवळ जनतेचे प्रश्न विचारल्याने, हे निलंबन केले गेले आहे. या निर्णयाचे आम्ही निषेध करीत असून यातून राज्य सरकारने लोकशाहीचा खून केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, हा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अन्यथा आम्ही राज्यातील ठिकठिकाणी आंदोलन करीतच राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
