‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’ म्युझिक अल्बमचे प्रकाशन
नव्या संगीत रचनांचा समावेश असलेल्या ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ऑनलाइन कार्यक्रमात करण्यात आले. या म्युझिक अल्बममध्ये मंदार आगाशे यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या वीस कविता संगीतबद्ध केल्या आहेत. अल्बम मधील गाणी राहुल देशपांडे यांच्यासह गायिका आर्या आंबेकर, प्रांजली बर्वे, धनश्री देशपांडे गणात्रा यांनी गायली आहेत.
मंदार आगाशे म्हणाले की, ‘सप्तरंग’ हा सुरेश भटांचा अतिशय वेगळा काव्यसंग्रह आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कविता समाविष्ट आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोज हा काव्यसंग्रह वाचत होतो. रोज चाली सुचत होत्या, त्यातून वीस गाणी तयार झाली. माझा सुरेश भट यांच्याशी बराच स्नेह होता. ते मला त्यांचे शब्द आणि माझी स्टाइल मिक्स करायला सांगायचे. आम्ही एकमेकांना पत्र पाठवायचो. माझ्यासारख्या नव्या संगीतकाराला खूप प्रोत्साहन द्यायचे, उदाहरणार्थ त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटी ते “गो अहेड” लिहायचे. त्यांच्या शब्दांना संगीतबद्ध करता आल्याचा आनंद वाटतो. वेगवेगळ्या धाटणीची, जुन्या संगीताचा आनंद देणारी गाणी या अल्बममध्ये रसिकांना ऐकायला मिळतील. कलाकार म्हणुन आम्ही ह्या अल्बम च्या माध्यमातून लोकांना आशा आणि निराशेच्या गर्तेतून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल देशपांडे म्हणाले, ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’या अल्बमच्या निमित्ताने मला सुरेश भट यांचं काव्य गायला मिळालं. या अल्बममधील गाणी अतिशय छान आणि मेलडीयस आहेत. वरकरणी ही गाणी सोपी वाटली, तरी गायला अवघड आहेत. हा मेगा अल्बम हेतूसह आला आहे, ह्या अवघड वेळेस आपल्या मनाला आणि हृदयाला सुख शांती लाभण्यासाठी. आपल्या शेड्यूलमधून एक सकाळ घ्या आणि अल्बम ऐका. मला खात्री आहे की तुम्हाला केवळ अल्बमच आवडणार नाही तर शांतताही वाटेल.
