आंबिल ओढा अतिक्रमण कारवाईला पालिकाच जबाबदार, कारवाईची राज्य सरकारमार्फत चौकशी व्हावी – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत
पुणे: पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा मी निषेध करतो. आंबिल ओढा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकाच जबाबदार आहे. माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर मी बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो. मात्र. आंबील ओढा कारवाई सुरु असताना महापौर काय झोपा काढत होते का? असा सवाल उपस्थित करीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेची राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी केली.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज आंबील ओढा येथील कारवाईची पहाणी केली व नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ता गोपाळदादा तिवारी, अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, झोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण नाला विस्तारीकरण असेल किंवा इतर कामे ऐन पावसाळ्यात कधीच केली जात नाही. पुणे महानगरपालिके कडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा मी निषेध करतो. कोरोना महामारी सुरू असताना आणि ऐन पावसाळ्यात अशा प्रकारच्या कारवाईमुळे येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवनच उध्वस्त करण्यात आले. ही सर्व गरीब लोकं आहेत. आधीच अडचणीत आलेल्या या लोकांच्या घरावर बुलडोझर चालविला गेला. या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.
झोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण याठिकाणी बिल्डरची माणसे हातात हातोडे आणि इतर साहित्य घेऊन हजर होते. या कारवाईच्या वेळी जबरदस्तीने येथील महिलांचे केस, हातपाय ओढले. त्यांना मारहाण करण्यात आली. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, या कारवाई दरम्यान भाजपचा कोणीही प्रतिनिधी तिथे गेला नव्हता. याठिकाणी वीज आधी तोडलेली नाही. बुलडोझरने तुटली असे स्पष्ट करतानाच या सर्व कारवाईची वरिष्ठांकडे तक्रार करणार असून राज्य सरकारकडून या सर्व घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी देखील करणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
अजित पवारांचा उल्लेख करताच राऊतांनी काढला पाय
आंबील ओढ्यात कारवाई दरम्यान बिल्डर अजित ओव्हर यांना पालकमंत्र्यांनीच तोडकाम कारवाई न थांबवण्याचे आदेश दिले,असा आरोप होत आहे, यावर पत्रकारानी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना अजित पवाराचा या घटनेचे काही संबंध आहे का? यांच्या बदल विचारले असताना डॉ. नितीन राऊत यांनी पहाणी स्थळांवरून काढता पाय घेतला.
