आता झोपडपट्टी परिसरात मिळणार कोरोना लस स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

पुणे : आता पुणे शहरातील झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांना त्यांच्या परिसरात महापा लिकेच्या वतीने कोरोनाची लस ऑफलाइन पद्धतीने विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

रासने म्हणाले, ‘स्थायी समितीच्या सदस्यांनी गेल्या दोन बैठकांमध्ये या संदर्भात चर्चा घडवून आणली होती. नगरसेवक राहूल भंडारे यांनी या संदर्भात झोपडपट्टी भागात कोरोना लसीकरणासाठी येणार्या अडचणींची माहिती दिली होती. आज स्थायी समितीत प्रशासनाशी तपशिलवार चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने लसीकरण करण्यास प्रशासनाने मान्यता दिली.

रासने पुढे म्हणाले, ‘पुणे शहरात सुमारे ३६० झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे साडेसात लाख नागरिक वास्तव्य करतात. अठरा वर्षांवरील नागरिकांची संख्या साडेचार लाखांहून अधिक आहे. सर्व वस्त्यांवर महापालिकेच्या वतीने केंद्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या केंद्रावर लस घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ऑफलाइन पद्धतीने नागरिकांना केंद्रावर जाऊन लस घेता येईल.’

रासने पुढे म्हणाले, ‘शहरातील झोपडपट्टीत राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या डोस बरोबर ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस ही या केंद्रावर उपलब्ध होणार आहे. दाट वस्तीच्या या भागात नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल गैरसमज आहेत. त्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पोस्टर्स, बॅनर, लिफलेटस, पत्रक आणि माईकद्वारे उद्घोषणा करण्यात येणार आहे. शक्यतो या परिसरातील रुग्णालये, आरोग्य केंद्र, दवाखाने, शाळा, अंगणवाड्यांमध्ये लवकरच ही केंद्र कार्यान्वित होतील.’

Leave a Reply

%d bloggers like this: