व्यसनांच्या चक्रात अडकण्यापेक्षा कर्तव्यपूर्ती साठी जीवन सार्थकी लावा – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
पुणेः- मानवी आयुष्य हे खुप सुंदर गिफ्ट आहे, ते व्यसनांच्या चक्रात अडकून निरर्थक बनविण्यापेक्षा
कर्तव्यपूर्ती साठी जीवन सार्थकी लावा असे मत पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दरवर्षी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डाॅ. मुक्ता पुणतांबेकर यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच आयुक्तांनी देखील पुणतांबेकर यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, जीवनामध्ये कधी किक पाहिजे असते, कधी शांती पाहिजे असते त्यासाठी व्यसनांचा आधार घेण्यापेक्षा सायकलिंक, स्विमिंक, फुटबाॅल आदी क्रीडा प्रकारांचा आधार घेतल्यास त्यातून मिळणारा आनंद क्रित्येक पटीने श्रेष्ठ आहे. ड्रग्जच्या विळख्यात अ़डकून दुष्टचक्रात अडकण्यापेक्षा चांगल्या सवयींची चक्रात अडका. ड्रग्ज सारख्या नशेच्या आहारी जाण्यामुळे ती नशा सातत्याने मिळण्यासाठी तुम्ही चुकीचे पाऊल उचलतात, गुन्हेगारीचा मार्ग निवडतात. सर्व नियम डावलून तुम्ही केवळ नशा या एकमेव मुद्याभोवती घुटमळत बसतात त्यापेक्षा कर्तव्य पुर्तींकडे लक्ष द्या. केवळ स्वतःच्या क्षणीक आनंदासाठी जगू नका.
प्रकट मुलाखतीच्या पूर्वसत्राला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डाॅ. मुक्ता पुणतांबेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘करा आरोग्याचा विचार, द्या व्यसनाला नकार’, असे घोषवाक्य यावर्षीसाठी निश्चित करण्यात आले आहे. वाईट व्यसनापासून दूर राहायचे असेल तर व्यायामासारखे चांगले व्यसन लावून घेणे महत्त्वाचे आहे. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
