आंबील ओढा प्रकरणी ‘वंचित’ची आक्रमक भूमिका; सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा
पुणे: आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच घरं पाडण्यात आली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाडापाडी थांबण्यात आली. मात्र, या कारवाईचे पडसाद आज उमटले. घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांसाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे, सोमवारी पुणे महानगरपालिके समोर ठिय्या मांडत आंदोलन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर महापालिकेनं गुरुवारी हातोडा चालवला होता. गुरुवारी पहाटे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरीक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रचंड गोंधळानंतरही महापालिकेनं कारवाई सुरूच ठेवली होती. सुरुवातीला कारवाईच्या आदेशाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बिल्डरनेच कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र, नंतर महापालिकेनं कारवाईची जबाबदारी घेत स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असून, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व येथील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दलखासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती घेतली. तसेच आंबील ओढा येथील नागरिकांची घरे पाडली गेली त्या घटनेबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच ज्या पाच नागरिकांची घरे पडली आहेत ती लवकरात लवकर बांधून देऊ असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
