असंघटित गरजूंना देखील मदत मिळणे आवश्यक -सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक

पुणे : भारतात अनेक आपत्ती येत असतात. मात्र, बहुतांश वेळा संघटित लोकांकडे मदत मोठया प्रमाणात दिली जाते. शेतकरी, संघटित कामगार यांना अनेकदा मदत मिळते. मात्र, शहरी भागात राहणा-या गरजू असंघटित घटकांना मदत मिळत नाही, ती त्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या यादीत देखील असंघटित गरजूंची नोंद नसते. त्यामुळे अशांना समाजाने मदत देणे हे माणुसकीचे कार्य आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.

माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाडयासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात उपेक्षित, वंचितांना धान्य किट देण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विश्वेश्वर बँकेचे राकेश कोकाटे, प्रदिप तुंगारे, अखिल झांजले, हेमंत जाधव, संयोजक सारंग सराफ, महेश काबरा, रुपेश चांदेकर, प्रफुल्ल रोकडे आदी उपस्थित होते. व्यासपीठातर्फे ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत देण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरुपी धान्य देण्याचा देखील प्रयत्न आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, कोविड काळात स्कूल बस, स्कूल रिक्षाचे काम ठप्प होते. त्यांना शासन नियमानुसार त्या गाडया दुसरीकडे देखील वापरता आल्या नाहीत. तसेच, घरकाम करणा-या अनेक महिलांना कामावर बोलविण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरी चूल बंद करण्याची वेळ आली. लोककलावंतांची व कलाकारांनी परिस्थिती देखील बिकट होती. अशांना ही मदत नव्हे, तर प्रसाद म्हणून देण्यात आला, हे कौतुकास्पद आहे. आजची परिस्थिती कठिण असून भविष्यात जिथे मदत लागेल, तेथे आपण पोहोचायला हवे.

आनंद सराफ म्हणाले, लॉकडाऊन म्हणजे सगळीकडे सर्व बंद होते. मात्र, अशा उपक्रमांच्या माध्यमातून माणुसकीचे दारे खुले करण्याचे काम तरुणाई करीत आहे. समाजातील असंघटित गरजू कुटुंबांच्या घरची चूल विझू नये, याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत असून दानशूरांनी मदतीकरीता पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले. सारंग सराफ यांनी प्रास्ताविक केले. हेमंत जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: