नव्या बँकिंग कायद्यामध्ये ‘सहकार’ मूल्य देखील जपणे गरजेचे- सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे : बँकिंग क्षेत्रातील व्यवस्था सुस्थितीत हवी असेल, तर बंधने व नियम असणे गरजेचे आहे. परंतु त्यासोबतच व्यवस्था सुलभ व सहज होईल, याचा देखील विचार व्हावा.  नव्या बँकिंग नियमन सुधारणा कायद्यामध्ये लोकशाही नियंत्रण व मूळ तत्त्वांचे उल्लंघन या गोष्टींचा विचार करुन सहकार मूल्य जपणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. 

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे  बँकिंग नियमन सुधारणा कायदा २०२० याचा सहकारी बँकांवर होणारा परिणाम याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरीया आदी उपस्थित होते. 

अनिल कवडे म्हणाले, सहकारी बँकांचा सहकार तत्वाला बाधित करणा-या तरतुदी सहकारी बँकांना लागू न करणेबाबत बीआयआर अ‍ॅक्टच्या कलम ५३ नुसार सूट मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रिझर्व बँक व सहकारी बँक यांच्यात नियंत्रक या नात्याने सणा-या संबंधांपेक्षा सहयोगाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. कोणत्याही कायदयाची अंमलबजावणी करताना घाईने करणे शक्य आहे का? याचा विचार होणे गरजेचे आहे. पुढच्या काळात मोठया प्रमाणात ठेवीदारांचा सहभाग व सहकार तत्व जपून काम करणे गरजेचे आहे. आयटी सारख्या नव्या तंत्राची जोड देखील असायला हवी.  

विद्याधर अनास्कर म्हणाले, सहकारातील मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सहकारी बँक ही कोणा एका व्यक्ती किंवा राजकीय पक्षाची नसून ती जनतेची आहे, ही भावना रुजायला हवी. बँकेला आर्थिक शिस्त असणे गरजेचे आहे. त्याकरीता केंद्र सरकार व रिझर्व बँकेला कायदा करण्याचा अधिकार आहे. 

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, बँकिग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील ज्या तरतुदी सहकार तत्वाला व लोकशाही व्यवस्थापनास बाधा आणत असतील, त्या तरतुदींविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणे आवश्यक आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सहकार या व्यासपीठावर आपले राजकीय जोडे बाहेर काढून एकत्रित येणे, ही काळाची गरज आहे. सहकार कायदा व नवीन बँकिंग नियमन कायद्यामध्ये परस्परविरोधीपणा आहे. 

कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माधव माटे, धर्मवीर बँकेचे डॉ.गोरख झोळ, इंद्रायणी बँकेचे एस.बी.चांडक यांनी आपले विचार मांडले.

Leave a Reply

%d bloggers like this: