Nagpur massacre – कुटूंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या
नागपूर: पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची धारदार हत्याराच्या सहाय्याने हत्या करुन आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडकीस आली. या हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं असाव, असा अंदाज नागपूर पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोक माटूळकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यानेच आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची धारदार हत्याराच्या सहाय्याने हत्या केली आहे. सदर घटना काल रात्री घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अलोक हा टेलरिंगचे काम करायचा. प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने हे सर्वजण राहायचे. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
