जीआयआयएस शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (GIIS) ने एका व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एका ऑनलाइन मंचावर एकत्र येत विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. शाळेच्या बालेवाडी आणि हडपसर या दोन्ही कॅम्पसमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत अत्यंत उत्साहात हा दिवस साजरा केला.
या कार्यक्रमासाठी शाळेने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना योगासनाचे तंत्र शिकण्यासाठी व कुठेही सहजपणे करता अशी आसने शिकण्यासाठी आमंत्रित केले होते. शरीर व मनातील समतोल साधत ताणतणाव दूर कसा करावा हे सर्वांना शिकविणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. हसतखेळत योगासने शिकल्याने या विद्यार्थ्यांमध्ये रस निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची तयारी करत असताना मुलांमध्ये सळसळणारा उत्साह ऑन-स्क्रीनसुद्धा जाणवत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी योगसूत्र सादर केले. यात त्यांनी संस्कृत श्लोकांचे पठण केले तसेच योगा डान्समध्ये संगीताच्या तालबद्ध ठेक्यावर योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्राणायम, सूर्यनमस्कार, ताडासन, अर्ध चक्रासन, शशांकासन, भुजंगासन, पवनमुक्तासन इत्यादी विविध योगमुद्रांची प्रात्यक्षिकेही त्यांनी दाखवली. विविध आसने, प्राणायम आणि ध्यानधारणेचे विशिष्ट फायदे आणि योगासनाचे हे प्रकार कसे करावेत याची माहिती देण्यावर शिक्षकांनी भर दिला. स्वास्थ्य जपण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी योगासाधना करण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रोत्साहित केले.
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (GIIS) च्या ऑपरेशन्स विभागाचे संचालक राजीव बन्सल म्हणाले, “योग म्हणजे भारताने जगाला दिलेली एक स्वास्थ्यभेट आहे आणि एक शैक्षणिक संस्था म्हणून योगसाधनेचे फायदे आपल्या विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. मागचे वर्ष युवामनांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते, कारण या काळात त्यांना मोठ्या अनिश्चिततेचा सामना करावा लागला, ज्याची परिणती चिंता आणि भीतीमध्ये झाली. अशा काळात योगासनांमुळे मन शांत होण्यास अत्यंत आवश्यक अशी बुद्धीची एकाग्रता पुन्हा मिळविण्यास मदत होते, पण त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्यामध्ये सुधारणा होऊन शरीराची चपळताही वाढते.
