शीख हेल्पलाइनच्या वतीने गरजूंना मदत
पुणे – कोरोनामुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले, अनेकांच्या हातातील छोटे- मोठे कामही परिस्थितीने हिरावून घेतले. एकीकडे हाताला काम नाही, खर्च करण्यासाठी दमडी नाही, अशा परिस्थितीत पाच-सहा जणांचे कुटुंब जगवायचे कसे ? त्यांना किमान एकवेळचे अन्न द्यायचे तरी कुठून ? अशा विवंचनेत हजारो गरीब, कष्टकरी आहेत. नेमक्या अशा गरजू लोकांचा शोध घेऊन त्यांना एक महिना पुरेल इतका शिधा देत शीख हेल्पलाइनने माणुसकीचे दर्शन घडवले.
आतापर्यंत ४०० हून अधिक कुटुंबांना किराणा मालाचे किट वाटप केले, शीख हेल्पलाइनच्या राज सिंग यांनी गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मार्चपासून हे किट सिंग यांनी थेट गरीब, गरजूंच्या हातात स्वतः देण्यास सुरवात केली. जनता वसाहत, येरवडा, यमुनानगर, विमाननगर, धानोरीतील राखपसरे वस्ती, हडपसरमधील रामटेकडी, वैदूवाडी अशा वेगवेगळ्या भागातील वस्त्यांमधील नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या या कामामध्ये मॉरिस भिसे, रोहन उंबरजे, अनघा घाटोळे यांचाही हातभार लागत आहे.
या विषयी बोलताना राज सिंग म्हणाले, शीख हेल्पलाइनने कोरोनाबाधीत व्यक्तींना ऑक्सिजनची भासणारी गरज लक्षात घेऊन, अनेक नागरीकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचीही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव वाचण्यास मदत झाली.कोरोनामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या गरिबांच्या पोटाला दोन घास मिळावेत, म्हणून हा उपक्रम सुरू केला. शीख समाजबांधव, मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती आपापल्या इच्छेनुसार देणगी देतात. त्यातूनच गिरीश राठी यांच्यासारख्या विक्रेत्यांकडून दर्जेदार व रास्त दरात किराणा मालाचे किट खरेदी करून, ते शहराच्या वेगवेगळ्या भागातील गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोचवीत आहोत.
